बारडा डोंगरावर झाले चकाकणाऱ्या वनस्पतीचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 12:04 AM2019-10-01T00:04:21+5:302019-10-01T00:04:36+5:30
तब्बल अडीच तासांपेक्षा अधिक वेळ अविरत चढून पश्चिम घाटातील ऐतिहासिक बारडा डोंगराचे शिखर सर करून भक्तांनी बारडा देवतेचे दर्शन घेतले.
- अनिरु द्ध पाटील
बोर्डी : मुसळधार पाऊस, हुडहुडी भरणारी थंडी आणि कानठळ्या बसवणा-या ढगांच्या गडगडाटात, घनदाट झाडीतून दगड - धोंड्याची निसरडी उभी चढाई. तब्बल अडीच तासांपेक्षा अधिक वेळ अविरत चढून पश्चिम घाटातील ऐतिहासिक बारडा डोंगराचे शिखर सर करून भक्तांनी बारडा देवतेचे दर्शन घेतले.
दरवर्षी प्रमाणे भाद्रपद महिन्यातील पितृ बारशीच्या मध्यरात्री डोंगरावरची प्रकाशित होणारी वनस्पती पाहाण्याकरिता गुरुवार, २६ सप्टेंबर रोजी बारशीच्या रात्री शेकडो भक्त येथे मुक्कामाला गेले होते. त्यांंनी यावेळी तारपानृत्याद्वारे धार्मिक भावना व्यक्त करून निसर्ग देवतेचे आभार व्यक्त केले. पालघर जिल्ह्यात पश्चिम घाटाच्या रांगांमध्ये महाराष्ट्र - गुजरात सीमेलगत बारडा हा ऐतिहासिक डोंगर असून या पट्ट्यात त्याची उंची सर्वाधिक आहे. द्रोणागिरीवर प्रकाशित होणा-या औषधी वनस्पतीचा उल्लेख रामायणात आला आहे. त्याची अनुभूती घेण्याचे भाग्य भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात मिळते. बारशीची मध्यरात्र ते सूर्योदयापर्यंत हा अद्भुत नजरा पाहता येतो. अनुभवी वैद्य तर या वनस्पतीचा काही भाग औषधी वापरासाठी करतात.
गेल्यावर्षीपेक्षा यंदा मुबलक पाणी पडल्याने विविधरंगी फुलांचे ताटवे फुललेले होते. शिखरावरच्या पाच-सहा एकरातल्या पूर्वेकडील पठाराच्या भागावर पिवळ्या फुलांचा पसरलेला हा ताटवा नयनरम्य दिसत असल्याची भावना वेवजी गावातील हसमुख दुबळा यांनी व्यक्त केली. चार वर्षांतून एकदा फुलल्यानंतर नामशेष होणाºया कारवीची रोपटी यंदा फुलली नव्हती. या वनस्पतीपासून आदिवासी झोपड्यांचे कुड (लाकडी भिंत) बनवतात. या वर्षी अधिक पाऊस झाल्याने चकाकणाºया वनस्पती अधिक प्रमाणात दिसल्याचे तो म्हणाला.
बारडा हा पश्चिम घाटातील सर्वात उंच डोंगर आहे. त्याच्या सीमा डहाणूतील अस्वाली, कैनाड, धामणगाव, गांगनगाव आणि तलासरी तालुक्यातील वेवजी, करजगाव, गिरगाव येथे पसरल्या असून येथून माथ्यापर्यंत जाता येते. बोर्डी वनपरीक्षेत्राअंतर्गत हा भाग येतो.
चढाई करताना अनुभवलेला हा वीस-पंचवीस वर्षांच्या काळातील सर्वाधिक पाऊस होता. धुके, निसरडी पायवाट यामुळे नेहमीपेक्षा जास्त वेळ लागला. डोंगरमाथ्यावर पाषणात कोरलेली गुहा, भूचर, पाण्याच्या टाक्या तसेच तलावात नेहमीपेक्षा अधिक पाणी होते. शेकोटी पेटवताना रात्रभर झालेली दमछाक आणि वनस्पती दिसल्यानंतर झालेला आनंद थकवा घालवणारा होता. सकाळी बारडा दैवताचे दर्शन घेतले.
- हसमुख दुबळा, ग्रामस्थ