गटार सफाई करताना आढळले मृत अर्भक
By धीरज परब | Published: April 28, 2024 09:46 PM2024-04-28T21:46:37+5:302024-04-28T21:49:01+5:30
पोलिसांनी अर्भक ताब्यात घेत ते भाईंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात शवविच्छेदन साठी पाठवले.
मीरारोड - भाईंदर पूर्वेला एका वाणिज्य संकुलाच्या आवारातील गटारात सुमारे ६ इंच लांबीचे पुरुष जातीचे अर्भक सापडले. फाटक मार्गावर सालासर कमर्शियल सेंटर हि वाणिज्य संकुलाची इमारत आहे. सदर इमारतीच्या आवारातील दैनंदिन साफसफाई करणाऱ्या सफाई कामगारास अंडरग्राउंड गटारात मृत अर्भक दिसून आले. नवघर पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्रसुतीपूर्वचे हे अर्भक सुमारे ६ इंच लांबीचे व पाऊण किलो वजनाचे आहे. त्याच्या शरीराचे इतर अवयव देखील विकसित झालेले नव्हते.
पोलिसांनी अर्भक ताब्यात घेत ते भाईंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात शवविच्छेदन साठी पाठवले. पोलीस शिपाई राहुल चव्हाण यांच्या फिर्यादी वरून नवघर पोलिसांनी २७ एप्रिलच्या रात्री अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीसाठी घेतले आहेत. ह्या इमारतीत सोनोग्राफी आदी विविध तपासण्या करणारी केंद्र आहेत. त्यामुळे या प्रकरणी प्राथमिक गुन्हा दाखल करून पोलिसांनी सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. वरीष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निवास गारळे हे या प्रकरणी तपास करत आहेत.