मुदतीआधी दुरूस्ती, पूल खुला, वरसावे ब्रीज ठणठणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 03:35 AM2018-12-24T03:35:04+5:302018-12-24T03:37:13+5:30
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील नवीन वरसावे पूल दुरुस्तीचे काम १५ दिवसांत पूर्ण झाल्याने रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
मीरा रोड : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील नवीन वरसावे पूल दुरुस्तीचे काम १५ दिवसांत पूर्ण झाल्याने रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. नाताळ व थर्टी फर्स्टच्या आधीच तो खुला झाल्याने पोलीस, नागरिक व परिसरातील हॉटेलचालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. प्राधिकरण व आयआरबीने मुदतीआधीच पुलाच्या दुरु स्तीचे काम पूर्ण केले आहे.
मुंबई-ठाण्याच्या दिशेने वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या नवीन पुलाच्या चार जॉइंट प्लेट्स नादुरु स्त झाल्याने त्यांच्या दुरूस्तीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह ठाणे जिल्हा प्रशासनाकडे दोन वर्शांपासून पाठपुरावा सुरू होता. पुलाची दुरु स्ती महत्त्वाची असली तरी, या पुलावरून रोज हजारो वाहनांची वाहतूक होत असल्याने प्रशासनानेसुद्धा चालढकल चालवली होती. महामार्ग प्राधिकरणाने पुलाची दुरु स्ती अत्यावश्यक असल्याचे सांगून दुर्घटना झाल्यास जबाबदार तुम्ही असाल, असे जिल्हा प्रशासनाला खडसावल्याने अखेर पालघर जिल्हा प्रशासनाने दुरुस्तीची अधिसूचना काढली. २६ नोव्हेंबरपासून एक महिन्यासाठी अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली. ही वाहतूक मनोर, चिंचोटीमार्गे भिवंडीतून वळवण्यात आली. नवीन पुलावरून एका मार्गिकेची वाहतूक हलक्या वाहनांसाठी खुली ठेवण्यात आली. दुसरी मार्गिका खोदून दुरुस्तीकाम हाती घेण्यात आले. परंतु मनोर, चिंचोटी व पुलाच्या सुरुवातीला पाच ओव्हरहेड गेंटरी पोस्ट बसवण्याच्या कामात काही दिवस वाया गेले. कधी ओव्हरहेड गेंटरीची उंची, तर कधी ती लांबूनच वाहनचालकास दिसली पाहिजे, अशा कारणांवरून पोलिसांकडून चालढकल करण्यात आली. प्राधिकरणाने पोलिसांच्या आडमुठेपणाला त्रासून दुरुस्तीकाम सुरू केले असता पोलिसांनी ते बंद पाडले.
शुक्रवारी, ८ डिसेंबर रोजी सकाळपासून पुलाच्या दुरुस्तीकामास सुरुवात झाली. नवीन पुलावरून एक मार्गिका लहान वाहनांसाठी खुली असली, तरी दुरुस्तीमुळे वाहने सावकाश चालवावी लागत होती. त्यामुळे वसईच्या दिशेने थेट ससुनवघर, मालजीपाड्यापर्यंत चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत होत्या. पुलापर्यंत यायला तीन ते चार तास लागत होते. वरसावेपासून थेट ठाण्यापर्यंत अवजड वाहनांमुळे वाहतूककोंडी होत होती. या दुरुस्तीचा परिणाम भिवंडी आणि ठाण्यातील वाहतुकीवर झाला होता.
वसईच्या दिशेने वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्याने पालघर पोलिसांनी ठाणे ग्रामीण पोलिसांशी चर्चा करून जुना पूल १० ते १५ मिनिटे मुंबई-ठाण्याहून जाणाºया वाहनांसाठी बंद करून वसईवरून येणारी वाहने सोडून कोंडी कमी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे कोंडीतून काही प्रमाणात दिलासा मिळाला. दुरु स्तीचे काम २६ नोव्हेंबरपासून सुरू होणार होते. प्रत्यक्षात काम सुरू व्हायला १२ दिवस विलंब झाल्याने अधिसूचनेच्या कालावधीत दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे आव्हान प्राधिकरणासमोर होते. परंतु, प्राधिकरणाचे अधिकारी दिनेश अग्रवाल, शशिभूषण यांच्यासह आयआरबीच्या अधिकारी, कर्मचाºयांनी अहोरात्र परिश्रम घेऊन अवघ्या १५ दिवसांत दुरु स्तीचे काम पूर्ण केले. पुलावरील चार एक्स्पॉन्शन जॉइंट्स प्लेट्स दुरु स्त करण्यात आल्या. पुलावरील खड्डे बुजवण्यासाठी सातत्याने खडी-डांबराचा थर टाकण्यात आल्याने रस्ता ओबडधोबड झाला होता. येथील अवास्तव खडी-डांबर खोदून काढून रस्त्याची दुरु स्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पुलावरील रस्ता समतल झाला असून आता वाहने सुसाट धावू शकणार आहेत. दुरु स्तीकामामुळे आता येणारी काही वर्शे नवीन पुलावरील वाहतुकीस कोणताही अडथळा येणार नाही, असे प्राधिकरणाच्या सूत्रांनी सांगितले.
सगळ्याच ठिकाणची कोंडी संपणार
२५ डिसेंबरचा नाताळ व थर्टी फर्स्टमुळे वाहनांची वाढती संख्या पाहता प्राधिकरणाने दुरु स्तीकाम लवकर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. पूल सुरू झाल्याने पोलिसांसह नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव करणारे डम्पर व पाणीविक्र ीचा व्यवसाय करणारे टँकरमाफिया आहेत. त्यांच्यासह महामार्गावरील बार व लॉजचालकांचेसुद्धा पूल लवकर सुरू झाल्याने उखळ पांढरे होणार आहे. या वाहतूककोंडीचा परिणाम कल्याण, भिवंडी चौफुलीवरील वाहतुकीवर व्हायचा. तिथेही प्रचंड रांगा लागायच्या आता तिथलीही वाहतूककोंडीची समस्या दूर होणार आहे.