खाट न मिळाल्याने उपचाराअभावी मृत्यू?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 12:01 AM2021-04-19T00:01:50+5:302021-04-19T00:02:27+5:30
डहाणूतील रुग्णाच्या नातेवाइकांचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
बोर्डी : आगर उपजिल्हा रुग्णालयाच्या कोविड कक्षाने रविवार, १८ एप्रिलच्या पहाटे खाट उपलब्ध नसल्याचे कारण देऊन ४२ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाला दाखल करण्यास नकार दिला. दरम्यान, रक्तदाबाचा त्रास वाढून त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी केला आहे. गावच्या स्मशानभूमीत त्याच्यावर नातेवाइकांनी अंत्यसंस्कार केले.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी राज्यातील आरोग्य यंत्रणेला, रुग्णांवरील उपचारासाठी खाटा उपलब्ध नसल्याचे उत्तर सहन केले जाणार नाही, अशा सूचना आणि इशारा दिला होता. त्याला चार दिवस उलटले नाही, तोच डहाणूत घडलेला प्रकार मन हेलावणारा आहे. ग्रामीण भागातही वाढत्या रुग्णसंख्येमुळे नवीन विलगीकरण कक्षाची स्थापना करूनही खाटा उपलब्ध होत नसल्याचे चित्र समोर आले आहे. गृहविलगीकरणात उपचार घेणार्या, ४२ वर्षीय व्यक्तीची प्रकृती रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास अचानक खालावली. त्यानंतर, त्याच्या नातेवाइकांनी आगर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या कोविड कक्षाशी संपर्क साधला. मात्र, खाटा उपलब्ध नसल्याचे सांगत, रुग्णाला दाखल करण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे जमिनीवर झोपवा. मात्र, उपचार सुरू करा, अशी विनवणी केल्याचे रुग्णाच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. मात्र, नंतर नाईलाजास्तव रुग्णाला घरी आणल्यानंतर काही वेळाने त्याचे निधन झाले. तीन-चार दिवसांपूर्वी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तो गृहविलगीकरणात होता. त्याला रक्तदाबाचा त्रास होता.
धावपळ ठरली व्यर्थ
रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार दिल्यामुळे उपचाराचे दरवाजे बंद झाल्याने धावपळ व्यर्थ ठरल्याने त्याचा मृत्यू ओढावल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. जीव धोक्यात घालून रुग्णाला दवाखान्यात नेण्यापासून ते अंत्यविधी करण्याचे काम नातेवाइकांनीच केले, अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर यावेळी उपस्थितांनी दिली.