कासा येथे ८ महिन्यांच्या गर्भवतीचा बाळासह मृत्यू, उपजिल्हा रुग्णालयात डाॅक्टरांचे दुर्लक्ष?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 07:05 AM2023-05-16T07:05:32+5:302023-05-16T07:05:47+5:30
उपजिल्हा रुग्णालयात उपचाराच्या पुरेशा सोयीसुविधा नसल्याने तिला सिल्व्हासा किंवा तलासरी येथील वेदांता हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला.
पालघर/कासा : आठ महिन्यांच्या गर्भवतीचा बाळासह मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आठ महिन्यांच्या गर्भवतीला प्रसूतिवेदना सुरू झाल्याने प्रसूतीसाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात नेल्यावर तिला एका परिचारिकेकडून गोळी देण्यात आली. नंतर मात्र तिच्याकडे संबंधित वैद्यकीय अधिकारी किंवा अन्य कोणीही लक्ष न दिल्याने तासाभरात तिची प्रकृती खालावली.
उपजिल्हा रुग्णालयात उपचाराच्या पुरेशा सोयीसुविधा नसल्याने तिला सिल्व्हासा किंवा तलासरी येथील वेदांता हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. तिच्या नातेवाइकांनी अडचणीचा सामना करीत धुंदलवाडी रुग्णालयात नेले, पण तोवर तिचा मृत्यू झाला.
सोनाली वाघात असे या महिलेचे नाव असून, ती डहाणू तालुक्यातील ओसरवीरा येथे राहणारी होती. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे आणि संबंधित वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे सोनालीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी तिचे पती राजू वाघात यांनी कासा पोलिस ठाण्यात केली आहे.
शुक्रवारी (दि. १२) संध्याकाळी ५ वाजता माझ्या पत्नीला रिक्षातून कासा उपजिल्हा रुग्णालयात आणले. त्यानंतर आम्ही तिला तलासरीत वेदांता रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी ती मरण पावल्याचे सांगितले. पुन्हा कासा रुग्णालयात नेले असता, पोलिस पंचनामा आणि शवविच्छेदन करून दोघांचे मृतदेह आमच्या हाती देण्यासाठी कासा उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाला १६ तास लागल्याचे राजू वाघात यांनी सांगितले.
अहवालानंतरच कारण समजेल : डॉ. बोदाडे
शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर तिच्या मृत्यूचे कारण समजू शकेल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय बोदाडे यांनी सांगितले, तर संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पालघर जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समिती सभापती संदेश ढोणे यांनी केली आहे.