तलासरीतील झाई आश्रमशाळेतील चौथीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 10:20 AM2022-07-10T10:20:41+5:302022-07-10T10:22:43+5:30

शनिवारी सकाळची न्याहारी केल्यानंतर तिची प्रकृती खालावल्यामुळे शाळा प्रशासनाकडून रुग्णालयात हलविताना रस्त्यात तिचा मृत्यू झाला.

Death of a 10 years student of Zai Ashram School in Talasari dahanu | तलासरीतील झाई आश्रमशाळेतील चौथीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

तलासरीतील झाई आश्रमशाळेतील चौथीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

Next

बोर्डी - एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या डहाणू कार्यालयाअंतर्गत तलासरी तालुक्यातील झाई आश्रमशाळेतील इयत्ता चौथीतील दहा वर्षीय विद्यार्थिनी सारिका भरत निमला (रा. झरी डोलारपाडा, ता. तलासरी) हिचे शनिवारी आजारामुळे निधन झाले. ती या निवासी शाळेत शिक्षण घेत होती. या शाळेतील काही विद्यार्थ्यांना ताप, सर्दी-खोकला, अंगदुखी या आजाराची लक्षणे दिसली आहेत. सारिकाच्या मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही.

डहाणू प्रकल्पाअंतर्गत झाई शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असून, एकूण २४१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी ४४ विद्यार्थी आजूबाजूच्या पाड्यावर राहणारे असून, घरून ये-जा करतात, तर २०७ विद्यार्थी शाळेत निवासी शिक्षण घेतात. पावसाळा सुरू असल्याने वातावरण बदलाने या शाळेतील काही विद्यार्थ्यांना सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी ही लक्षणे आढळल्यानंतर शाळा प्रशासनाने त्यांना शुक्रवारी देहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन उपचार केले होते. त्यामध्ये सारिकाचाही समावेश होता.

शनिवारी सकाळची न्याहारी केल्यानंतर तिची प्रकृती खालावल्यामुळे शाळा प्रशासनाकडून रुग्णालयात हलविताना रस्त्यात तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी तिचा मृतदेह डहाणूच्या आगर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती प्रकल्प अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच घोलवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले, तर परिसरातील नागरिक, समाजसेवक, लोकप्रतिनिधी आणि पालकांनी शाळेत धाव घेतली.

मृत्यू कशामुळे?

शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांच्या तपासणीचे काम हाती घेण्यात आले. सारिकाचा मृत्यू आजारपणाने की विषबाधेतून हा प्रश्न पालकांना पडला असून, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

Web Title: Death of a 10 years student of Zai Ashram School in Talasari dahanu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.