उपचार न मिळाल्याने गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, पालघर जिल्ह्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 06:38 AM2024-01-20T06:38:52+5:302024-01-20T06:39:32+5:30
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आणि वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
- रवींद्र साळवे
मोखाडा : पालघर जिल्ह्यात दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्था सलाईनवर असल्याचे पुन्हा उघड झाले असून मोखाडा तालुक्यातील गर्भवती आदिवासी महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने पोटातील बाळासह तिचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आणि वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. महिलेच्या बाळाचा पोटातच मृत्यू झाल्याचे मोखाडा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. भरतकुमार महाले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
मोखाडापासून २० कि.मी.वरील शिरसगाव ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या गणेशवाडी येथील गर्भवती महिला रूपाली भाऊ रोज (वय २५) हिला आठव्या महिन्यातच प्रसूतीच्या कळा रविवारी सुरू झाल्या. त्यामुळे तिला खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले; परंतु, तेथे डॉक्टरांनी कोणतेही उपचार केले नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
...म्हणून नाशिकला पाठवले
डॉक्टरांनी उपचार न केल्याने रूपाली हिला घरी नेण्यात आले. सोमवारी सकाळी तिला मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; परंतु, त्यानंतर तिच्या बाळाचा पोटातच मृत्यू झाल्याने तिला नाशिक येथे नेण्यास सांगण्यात आले, अशी माहिती मोखाडा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. भरतकुमार महाले यांनी दिली. तिला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे तीन-चार दिवसांच्या उपचारानंतर शुक्रवारी गर्भवती रुपाली हिचा मृत्यू झाला.
सुविधा नसल्याने वर्षभरात २० मातांचा मृत्यू, २९४ बालमृत्यू
मोखाड्यातील आदिवासी भागात रस्ता, वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत. आजही येथील आदिवासी गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी दवाखान्यात आणण्यासाठी डोली करून ७ ते ८ किलोमीटरची पायपीट करावी लागते.वर्षभरात चांगली आरोग्य सेवा न मिळाल्याने २० माता आणि २९४ बालमृत्यू झाले आहेत.
- मोखाडा ग्रामीण रुग्णालयात वेळेत योग्य उपचार मिळाले असते तर माझी पत्नी व बाळ दोन्ही वाचले असते. या घटनेला मोखाडा ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर व संबंधित जबाबदार आहेत. - भाऊ रोज, रुपालीचा पती