वसईतील खेळाडूचा विजेच्या झटक्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 04:38 AM2017-10-18T04:38:21+5:302017-10-18T04:38:29+5:30
वसईतील देवाळे या गावातील मनिष भारत वर्तक (३९) या तरुण खेळाडूचा सोमवारी घरी इस्त्रीच्या वायरला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.
वसई : वसईतील देवाळे या गावातील मनिष भारत वर्तक (३९) या तरुण खेळाडूचा सोमवारी घरी इस्त्रीच्या वायरला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. त्याला अत्यवस्थ स्थितीत बंगली येथील कार्डिनल ग्रेशीयस रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
उत्कृष्ट शूटिंगबॉलपटू असलेल्या मनिषने तालुका व जिल्हापातळीवरील अनेक शूटिंगबॉल स्पर्धांत चांगली कामगिरी केली होती. १९९७ साली १९ वर्षांखालील महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी त्याची ठाणे जिल्ह्यातून निवड झाली होती.
वसई ते लेह-लडाख प्रवास तसेच समुद्रसपाटीहून ५६०२ मीटर (१८३८० फूट) हा जगातील सर्वांत उंच असलेल्या खारदूंगला पास या मार्गावर जाण्यासाठी आखलेल्या मोहिमेत त्याचा यशस्वी सहभाग होता.
वसई अॅडव्हेंचर क्लब या गिरिभ्रमण संस्थेचा सभासद असलेल्या मनिषच्या अकस्मात निधनाने कुटुंबीय व मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या पश्चात पत्नी दीप्ती, आई उषा व वडील भारत वर्तक असा परिवार आहे.