वसईतील रिसॉर्टमधील स्विमिंग पूल ठरले मृत्यूचे सापळे, आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 04:14 AM2017-11-02T04:14:40+5:302017-11-02T04:14:44+5:30
तालुक्यात असलेल्या रिसॉर्टमधील स्विमिंग पूलमध्ये बुडून आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील काही दारु प्यायल्याने बुडून मरण पावले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे बहुतेक रिसॉर्टमध्ये प्रशिक्षित जीव रक्षक तैनात केलेले नाहीत.
वसई : तालुक्यात असलेल्या रिसॉर्टमधील स्विमिंग पूलमध्ये बुडून आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील काही दारु प्यायल्याने बुडून मरण पावले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे बहुतेक रिसॉर्टमध्ये प्रशिक्षित जीव रक्षक तैनात केलेले नाहीत. स्विमिंग पूल बेकायदा असून नियमांच्या भंग केला जात असल्याचेही उजेडात आले आहे.
वसई विरार परिसरात समुद्रकिनाºयावर वसई गाव, भुईगाव, कळंब, राजोडी, वटार (सत्पाळा), अर्नाळा, चुळणे, वासळई, गिरीज, मर्सेस, रानगाव, तिल्हेर, भालीवली, कौलार खुर्द, घाटेघर परिसरात रिसॉर्ट फोफावले आहे.
किनारपट्टीवरील कळंब, राजोडी परिसरात तर सरकारी जमीन अतिक्रमण करून त्यावर बेकायदा रिसॉर्ट बांधले आहे. कळंब परिसरात तर सीआरझेडचे उल्लंघन करून थेट किनाºयावर रिसॉर्ट थाटण्यात आले आहेत. खाजगी जागांवर असलेल्या बहुसंख्य रिसॉर्ट चालकांनी बेकायदेशिर बांधकामे केली आहेत. बहुतेक रिसॉर्टमध्ये बेकायदेशीरपणे दमणची दारू विकली जात असल्याची तक्रार आमदार आ़नंद ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
त्यांनी रिसॉर्टमधील स्विमिंग पूलांमध्ये आतापर्यंत तब्बल ११ जणांचा बुडून मृत्यू झाल्याने बेकायदेशीर रिसॉर्टचा गंभीर प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारी नेला आहे. एकट्या अर्नाळा परिसरातील वेगवेगळ््या रिसॉर्टमधील स्विमिंग पूलमध्ये बुडून ९ जणांचा मृ्त्यू झाला आहे.
तर कळंब आणि मर्सिस येथील स्विमिंग पूलमध्ये बुडून प्रत्येकी एक-एक पर्यटक मरण पावले आहेत. अर्नाळा येथील सी बिच रिसॉर्टमध्ये झोपेत असलेल्या आदित्य सिंग (३१) याचा मृत्यु झाला होता. तर पाटील रिसॉर्टमधील रुममध्ये कमलाकर सातवी (२०) याने आत्महत्या केली होती.
बहुतेक रिसॉर्टमधील स्विमिंग पूल बेकायदेशीर बांधण्यात आले आहेत. खास प्रशिक्षण घेतलेले जीव रक्षक नेमणे बंधनकारक आहे. त्यांना दर तीन वर्षांनी प्रशिक्षण घेणेही बंधनकारक आहे. बुडालेल्या वाचवण्यासोबतच त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्याचे कामही प्रशिक्षित सुरक्षा रक्षक करतात.
मात्र, रिसॉर्ट चालक असे प्रशिक्षित जीव रक्षक नेमत नाहीत. त्यांना पगार देणे परवडत नसल्याचे कारण पुढे करून रिसॉर्ट चालक घरातीलच माणसे सुरक्षा रक्षक म्हणून नेमतात. त्यामुळे दुर्घटना घडून पर्यटकांना प्राणास मुकावे लागत असल्याची त्यांची तक्रार आहे.
बेकायदा विकली जाणारी दारू हेही पर्यटकांचे स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू पावण्यामागचे महत्वाचे कारण असल्याचेही उजेडात आले आहे. दुसरीकडे, बहुतेक रिसॉर्टमध्ये अनैतिक धंदे होत असल्याच्या तक्रारी आहेत. गेल्या महिन्यात कळंब येथील एका रिसॉर्टमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सतत दोन महिने बलात्कार केल्याची घटना उजेडात आली होती.
त्याआधी कळंबमध्येच वेश्याव्यवसायाठी आणलेल्या दोन मुलींची सुटका केल्याचे प्रकरणही उजेडात आले होते. राजोडी आणि चुळणे गावकºयांनी रिसॉर्ट संस्कृतीला विरोध सुरु केला आहे. सामाजिक स्वास्थ बिघडवण्याचे काम
करणाºया अशा रिसॉर्टवर कारवाई करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे.
गेल्या आठवड्यात कळंब येथील एका रिसॉर्टमध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. मात्र, हे प्रकरण पोलिसांच्या मदतीने दडपण्याचे काम करण्यात आले. अशा पद्धतीने स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची बरीचशी प्रकरणे पोलीस आणि डॉक्टरांच्या मदतीने खोटे अहवाल देऊन दडपली गेली असल्याचीही त्यांची तक्रार
आहे.
स्विमिंग पूलमध्ये बुडालेल्यांची नावे
- निखिल मकवान
(वय १२, पाटील रिसॉर्ट अर्नाळा)
- अमान इमरान शेख
(वय ६, स्वागत रिसॉर्ट, अर्नाळा)
- हिरालाल रामनंदन राम (४०, ग्रीन पॅराडाईज रिसॉर्ट, अर्नाळा)
- प्रमोद लक्ष्मण जाधव
(२७, ग्रीन रोडाईज रिसॉर्ट, अर्नाळा)
- अजय रमेश राठोड (ममता रिसॉर्ट)
- निशिकांत रमेश पितळे
(३२, विसावा रिसॉर्ट)
- करण भगतभाई मकवाना
(२०, पाटील रिसॉर्ट)
- जयेश कमळाकर भोईर
(२५, मंधन रिसॉर्ट)
-लिब्रिएस ग्रॅब्रीएल कार्डोस
(३६, मिनीगोवा रिसॉर्ट)
- अमित धरम सिंग
(२०, पाम बिच रिसॉर्ट)
- शाम त्रिमूळ ९३८, तुलसी रिसॉर्ट)