विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 12:06 AM2019-09-17T00:06:53+5:302019-09-17T00:06:59+5:30
पाण्यात पडलेल्या जिवंत वीज वाहिनीमुळे विजेचा जबरदस्त धक्का लागून एक महिला जागीच गतप्राण झाल्याची हृदयद्रावक घटना वसईतील मूळगाव येथे घडली आहे.
वसई/नालासोपारा : मुसळधार पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाट काढत जात असताना पाण्यात पडलेल्या जिवंत वीज वाहिनीमुळे विजेचा जबरदस्त धक्का लागून एक महिला जागीच गतप्राण झाल्याची हृदयद्रावक घटना वसईतील मूळगाव येथे घडली आहे. यामुळे महावितरण कंपनी विरोधात वसईत तीव्र संताप व्यक्त होत आहे. ज्योत्स्ना हिला दोन लहान मुले आहेत. अधिक माहितीनुसार, मूळगाव परिसरातील सातमा देवी परिसरातून जोत्स्ना अल्पेश परमार (२७) या तामतलावाच्या दिशेने जात होत्या. यावेळी मुसळधार पावसामुळे रस्त्यावर बऱ्यापैकी पाणीही साचले होते.
या साचलेल्या पाण्यात वीज वाहिनीची जिवंत तार पडली होती. हे लक्षात न आल्याने पाण्यातून जात असताना ज्योत्स्नाला विजेचा जबरदस्त धक्का लागला. त्यावेळी रस्त्यावरील काही ग्रामस्थांनी लागलीच या महिलेला महापालिकेच्या सर डीएम पेटिट रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या प्रकरणी वसई पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे या घटनेमुळे वसईतील जुनाट आणि जीर्ण वीज वितरण व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
>मूळगाव येथे घडलेली घटना दुर्देवी आहे, मात्र या एकूणच घटनेची सखोल चौकशी व तपासणी आपण विद्युत निरीक्षक तपासणी विभागाकडून करत आहोत, अन्य काही तांत्रिक चुका नेमक्या कोणी केल्या आहेत, यांच्या सखोल चौकशीनंतर दोषी आढळून येईल, त्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच वसई शहरात जुन्या डीपी अथवा जीर्ण झालेली वीज वितरण व्यवस्था बदलणे आदींचे काम सुरू आहे. पुढील आठ महिन्यात टप्याटप्याने ही सर्व कामे पूर्ण होतील.
- दिनेश अगरवाल,
अधीक्षक अभियंता, वसई सर्कल