मीरा भाईंदरमधील 'डीप क्लीन ड्राईव्ह'चा शुभारंभ' शनिवारी मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते
By धीरज परब | Published: December 27, 2023 07:32 PM2023-12-27T19:32:53+5:302023-12-27T19:33:09+5:30
३० तारखेला सकाळी ९ वाजता नवघर नाका हनुमान मंदिर येथून या स्वछता मोहिमेची सुरुवात होईल.
मीरारोड - 'मुख्यमंत्री स्वछता अभियान' अंतर्गत 'डीप क्लीन ड्राईव्ह' म्हणजेच संपूर्ण स्वछतेच्या मोहिमेचा मीरा भाईंदर मधील शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवार ३० डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता करणार असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. मीरा भाईंदर महापालिका मुख्यालयात बुधवारी महापालिका आयुक्त संजय काटकर यांच्यासह आमदार प्रताप सरनाईक यांनी ह्या मोहिमे बाबत माहिती दिली . त्या आधी त्यांची या स्वछता मोहिमेच्या आयोजना बाबत बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशनानुसार व्यापक स्तरावर संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. मुंबईत नंतर हि संपूर्ण स्वच्छता (डीप क्लिनिंग) मोहीम राबविण्यास सुरुवात करणारे मीरा भाईंदर हे दुसरे शहर ठरणार आहे. स्वच्छ, सुंदर आणि हरित शहर राहावे यासाठी अनेक उपक्रम , मोहिमा हाती घेतल्या जातील. लोक सहभाग वाढावा यासाठी स्वतः मुख्यमंत्री मीरा भाईंदरच्या रस्त्यावर उतरणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आ . सरनाईक यांनी केले आहे.
३० तारखेला सकाळी ९ वाजता नवघर नाका हनुमान मंदिर येथून या स्वछता मोहिमेची सुरुवात होईल. हनुमान मंदिर परिसर, येथील मार्केट व तलाव परिसरात स्वछता मोहीम सुरु होईल. त्यानंतर प्रभाग क्रमांक १२ मध्ये मुख्य रस्त्यावर स्वछता मोहिम राबवली जाणार असून त्यात स्वतः मुख्यमंत्री सहभागी होतील. याच परिसरात आ. सरनाईक यांच्या संकल्पनेतून महापालिकेची पहिली सीबीएसई शाळा सुरु होणार असून त्या शाळा इमारतीला मुख्यमंत्री भेट देतील. तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कला दालन निर्मितीचे बांधकाम जवळपास पूर्ण होत आले असून त्या कामाची मुख्यमंत्री पाहणी करतील. आ. सरनाईक यांच्या विशेष निधीतून मीरा भाईंदर क्षेत्रात कचरा संकलन करण्यासाठी १० घंटागाड्या खरेदी करण्यात आल्या असून त्या गाड्यांचे लोकार्पणही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
याआधी मीरा भाईंदर शहराला स्वछतेसाठी राज्य व केंद्र सरकारचे पुरस्कार मिळाले आहेत. आता संपूर्ण स्वछता म्हणजेच डीप क्लीन ड्राईव्ह ही मोहीम आणखी व्यापक व प्रभावीपणे राबवली जाणार असून त्यात नागरिकांनी निरंतर सहभाग घ्यावा. लोक सहभाग वाढविण्यासाठी लोकांचे प्रबोधन व विविध उपक्रम केले जातील. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी संपूर्ण आराखडा बनवला गेल्याची माहिती आमदार सरनाईक यांनी दिली.
आयुक्त काटकर म्हणाले की , डीप क्लीन ड्राईव्ह अंतर्गत ६८ प्रकारची विविध कामे आम्ही करणार आहोत. शहरातील नागरिकांचे राहणीमान सुधारावे , शहर अधिक स्वच्छ व सुंदर राहावे यासाठी प्रयत्न केले जातील. स्वछता मोहीम पुढील ३ महिन्यात आणखी प्रभावीपणे राबवून यशस्वी केली जाईल. स्वछता ही निरंतर व नियमीत चालणारी प्रकिया आहे. नागरिकांमध्ये सार्वजनिक स्वछ्तेबाबत जाणीव व जागरूकता निर्माण करून , प्रबोधन करण्यासही पालिका तितकेच प्राधान्य देईल. शहरात ८८ उद्याने अधिक चांगली केली जातील. पुढील ३ महिन्यात १०० टक्के कचरा वर्गीकरण प्रत्यक्षात व्हायला हवे असे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. पालिका बायोगॅस प्लांट तयार करत आहे. रस्त्यावर धुळीचा त्रास होतोय तो कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.