दिवाळीत ‘घोर नृत्योत्सव’
By admin | Published: November 14, 2015 01:58 AM2015-11-14T01:58:23+5:302015-11-14T01:58:23+5:30
महाराष्ट्र गुजरात सीमा भागात दिवाळीनिमित्त घोर नृत्योत्सव साजरा करण्याची फार जुनी परंपरा आहे. मंडली मातेच्या विधीवत पुजेने ‘घोर नृत्याला’ प्रारंभ झाला असून स्थानिकांसह
बोर्डी : महाराष्ट्र गुजरात सीमा भागात दिवाळीनिमित्त घोर नृत्योत्सव साजरा करण्याची फार जुनी परंपरा आहे. मंडली मातेच्या विधीवत पुजेने ‘घोर नृत्याला’ प्रारंभ झाला असून स्थानिकांसह पर्यटकांकरीता नृत्याविष्काराची पर्वणी अश्विन अमावस्येपर्यंत लुटता येणार आहे.
राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्राच्या उत्तर सीमेलगत गावांमध्ये घोर नृत्योत्सव येथील ग्रामीण लोक संस्कृतीचा मानबिंदु आहे. पालघर जिल्ह्णाच्या डहाणू व तलासरी तालुक्यातील माच्छी, भंडारी, बारी या गुजराती भाषीक समाजात घोर नाचाला मानाचं स्थान आहे. हा पुरूषप्रधान सामुहीक नाच प्रकार आहे. धोतर, बनियान, फेटा, विविधरंगी लुगडी, काजळ, झेंडू फुल आणि एका हातात घुंगरूच्या दांडीया तर दुसऱ्या हातात मोरपंखाचा गुच्छा घेउन दोन ते तीन प्रकारात पारंपारीक पद्धतीने फेरधरून नाच केला जातो. समाज प्रतिष्ठा मिळत असल्याने प्रत्येक पुरूष एकदातरी घोर नाचतो. कवया हा गायक, नृत्य आणि संगीत सुरावटींनी गणपती, राम-कृष्ण, रामायण, महाभारतातील प्रसंग गायली जातात. स्वातंत्र्यापुर्वी ब्रिटीश राजवट उधळवून लावण्याकरीता देशवासीयांना प्रेरित करण्यासाठी कवया स्फुरण काव्य गाऊन शाहीराची भुमीका निभावित असल्याचा इतिहास आहे.
मंडली मातेच्या (सरस्वती देवी) विधीवत पुजेने धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, अश्विन अमावस्या या तीन दिवसात परिसरातील गाव, कुलदैवत व ग्रामदेवतेची मंदीर, सार्वजनिक ठिकाणी घोर नाचली जाते. अमावस्थेच्या रात्री सुवाशिनींनी घोर यांना औक्षण केल्यानंतर त्याची सांगता होते. यावेळी नृत्याची पर्वणी पाहण्याकरीता पर्यटकांची मोठी गर्दी असते. (वार्ताहर)