मोखाड्यात शिक्षणाचा बोजवारा

By admin | Published: August 6, 2015 02:48 AM2015-08-06T02:48:51+5:302015-08-06T02:48:51+5:30

आदिवासीबहुल असणाऱ्या मोखाडा भागात प्राथमिक शिक्षणाचा पुरता बोजवारा उडाला असून चौथीच्या विद्यार्थ्यांना वाचता येत नसल्याचे निदर्शनास आले आहे

Defeat of education in the Moksha | मोखाड्यात शिक्षणाचा बोजवारा

मोखाड्यात शिक्षणाचा बोजवारा

Next

रवींद्र साळवे , मोखाडा
आदिवासीबहुल असणाऱ्या मोखाडा भागात प्राथमिक शिक्षणाचा पुरता बोजवारा उडाला असून चौथीच्या विद्यार्थ्यांना वाचता येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. वर्गात शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी शाळेकडे फिरविलेली पाठ आणि विद्यार्थी येत नसल्याने शाळेत जाण्यासाठी टाळाटाळ करणारे शिक्षक असे येथील चित्र असल्याने येथील प्राथमिक शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे.
तालुक्यात १५८ जि.प. शाळा असून यामध्ये १२ हजारांच्या आसपास मुले शिक्षण घेत आहेत. परंतु, या ठिकाणी शिक्षणाधिकाऱ्यांसह अनेक पदे रिक्तच आहेत. शा.पो.आ. अधीक्षक १ पद मंजूर असून ते रिक्त आहे. विस्तार अधिकारी (शिक्षण) श्रेणी-२ तीन पदे मंजूर असून तिन्ही पदे रिक्त आहेत. मुख्याध्यापक मंजूर पदे २४ असून त्यातील २ रिक्त आहेत. पदवीधर शिक्षक मंजूर पदे ८४ असून त्यातील रिक्त ११ आहेत. सहायक शिक्षकांची मंजूर पदे ३६२ असून त्यातील २४ रिक्त आहेत. अशी एकूण ४९० पदे मंजूर असून त्यातील ४१ पदे रिक्त आहेत. शिक्षकांचीसुद्धा पदे मोठ्या संख्येने रिक्त असल्याने कित्येक गावपाड्यांमध्ये वर्गांवर शिक्षक नसल्याची स्थिती आहे.
तालुक्यातील जि.प. शाळांची अवस्था अत्यंत बिकट झाली असल्याने पावसाळ्यात मात्र गळक्या, पडक्या शाळांमध्ये बसून मुलांना ज्ञानार्जन करावे लागत आहे. आजघडीला ४२ शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असून त्याबाबतचे प्रस्ताव बांधकाम विभागाकडून पाठविण्यात आले आहेत. यामध्ये भेंडीचापाडा, नवीवाडी, शेड्याची मेट जि.प. शाळांची अधिक दुरवस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून धामणशेत येथील जि.प. शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असल्याने वर्गखोल्यांअभावी समाजमंदिरात जि.प. शाळा भरविण्याची नामुष्की ओढवली आहे. परंतु, याकडे सर्वांचेच दुर्लक्ष आहे. तसेच शाळांच्या आवारातील शौचालयाचींसुद्धा दुरवस्था झाली असल्याने याचा उपयोग होताना दिसत नाही.

Web Title: Defeat of education in the Moksha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.