रस्त्यातील घराचे बांधकाम हटवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 11:46 PM2021-03-12T23:46:24+5:302021-03-12T23:46:46+5:30
नगरपंचायतीची बंदाेबस्तात कारवाई : आंदाेलनाला आले यश
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा : वाडा शहरातील पारधीपाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर केलेले बेकायदा घराचे बांधकाम शुक्रवारी वाडा नगरपंचायतीने पाेलीस बंदाेबस्तात ताेडले. हे बांधकाम हटविण्यासाठी श्रमजीवी संघटनेने नगरपंचायतीच्या कार्यालयासमाेर आंदाेलन केले हाेते, त्याला यश आले असून पारधीपाड्यातील नागरिकांचा रस्ता खुला झाला आहे.
रस्ता यमुनाबाई साबळे यांच्या मालकीच्या जागेत आहे. यमुनाबाई यांनी हा रस्ता पारधीपाड्यातील लोकांना लेखी सहमतीने वापरासाठी दिला आहे. मात्र, एका व्यक्तीने या रस्त्यावरच घर बांधल्याने हा मार्गच बंद झाला होता. या बांधकामाविरोधात नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला असता संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन रहिवाशांना दिले होते. मात्र, काहीच कारवाई न झाल्याने १ मार्चला पारधीपाड्यातील नागरिकांनी श्रमजीवी संघटनेच्या झेंड्याखाली ठिय्या आंदोलन सुरू केले होते. या आंदाेलनाची दखल घेत नगरपंचायतीने पोलीस बंदोबस्तात हे बांधकाम तोडून पारधीपाड्यातील नागरिकांचा रस्त्याचा मार्ग मोकळा केला.