रेल्वे पुलासाठी सेनेचे भीक मांगो; विरोधी पक्षनेत्या किरण चेंदवणकर यांचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 12:05 AM2018-09-08T00:05:18+5:302018-09-08T00:05:44+5:30
वसई पूर्व -पश्चिम भागाला जोडणाऱ्या येथील बहुचर्चित रेल्वे उड्डाण पुलाच्या करोडो रुपयांच्या निधीसाठी आणि हा पूल तत्काळ दुरुस्त करून वाहतुकीसाठी खुला करण्याच्या मागणीसाठी येथे शुक्रवारी सकाळी शिवसेनेने भीक मांगो आंदोलन केले.
वसई : वसई पूर्व -पश्चिम भागाला जोडणाऱ्या येथील बहुचर्चित रेल्वे उड्डाण पुलाच्या करोडो रुपयांच्या निधीसाठी आणि हा पूल तत्काळ दुरुस्त करून वाहतुकीसाठी खुला करण्याच्या मागणीसाठी येथे शुक्रवारी सकाळी शिवसेनेने भीक मांगो आंदोलन केले.
यावेळी शेकडो शिवसैनिकांनी आपल्या नेते मंडळीसहीत रस्त्यावरील पादचारी व वाहनचालकांकडे भीक मागितली आणि संबंधित प्रशासनांच्या प्रति निषेध व्यक्त करीत जो पर्यंत संपूर्ण निधी जमा होत नाही तोपर्यंत शिवसेना या निधीसाठी रस्त्यावर भीक मांगो आंदोलन सुरूच ठेवेल, असा निर्धार महापालिकेतील सेनेच्या गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी व्यक्त केला.
दरम्यान अंधेरी पुलाच्या भीषण दुर्घटनेनंतर वसई अंबाडी स्थित रेल्वे पूल हा दुरु स्तीच्या नावाखाली दोन महिन्यापूर्वी बंद करण्यात आला, त्यामुळे याठिकाणी आता वाहनचालकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरं जावे लागत आहे. परिणामी दोन महिने उलटले तरीही अद्याप रेल्वे आणि इतर जबाबदार यंत्रणांकडून या पुलाच्या डागडुजीबाबत कुठलीही हालचाल होत नाही.
या पुलाच्या दुरु स्तीसाठी १ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे मात्र हा निधी उपलब्ध करून देण्यास रेल्वे प्रशासन ,सार्वजनिक बांधकाम विभाग, एम एम आर डी .ए आणि वसई विरार शहर महापालिका या सर्व यंत्रणांनी नकार दिला आहे, यामुळे ही दुरु स्ती नेमकी कोण करणार याबाबत वसईत सर्वत्र संभ्रम निर्माण झाला असल्याने या पुलाच्या डागडुजीसाठी अनोखं भीक मांगो करण्यात आले, यावेळी विनायक निकम, निलेश तेंडुलकर ,प्रवीण म्हाप्रळकर ,मिलिंद खानोलकर ,विवेक पाटील तसेच शेकडो शिवसैनिक सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते आदी सहभागी झाले होते. माणिकपूर पोलिसांनी याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे आंदोलन शांततेत पार पडलें. परंतु दरम्यान दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा तासंन्तास लागल्या होत्या.
गैरसोय झाली तरी कुणीतरी या स्वरुपात का असेना या प्रश्नावर आवाज उठवला याबद्दल जनतेते काहीसे समाधान व्यक्त केले जात होते.
वाहतूककोंडी वाढली
जुलै महिन्यात अनिश्चित कालावधीसाठी हा पूल बंद करण्यात येत असल्याबाबत रेल्वे प्रशासनाने माणिकपूर पोलीस ठाण्याला कळवले होते.
नवीन पुलावर मोठी वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.कारण या दोंन्ही उड्डाणपूलांच्या तोंडावर पूर्व व पश्चिम येथे सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली आहे. आता या पुलाच्या डागडुगीचा खर्च कोटीच्या घरात आहे. तो कोण उचलणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण महापालिकेने याबाबत हात आखडता घेतला आहे.
दुरुस्तीचा १.४० कोटी खर्च करायचा कोणी? यावरून माजला आहे वादंग
नालासोपारा : वसईतील ३८ वर्षे जुना अंबाडी रेल्वे उड्डाण पूल वाहतुकीस धोकादायक झाल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद करण्यात आला आहे.मात्र अजुनही या पुलाच्या डागडुजीस मुहूर्त सापडत नसल्यामुळे या पुलाशेजारील नवीन उड्डाणपूलावर ट्रॅफिक जाम होऊ लागला आहे.याचा मोठा फटका या मार्गावरून प्रवास करणा-या नागरिकांना बसतो आहे. या पुलाच्या डागडुजीसाठी १ कोटी ४० लाखाचा खर्च आहे.
अंधेरी येथे झालेल्या दुर्घटनेनंतर वसईतील अंबाडी पूल धोकादायक असल्याचे लक्षात आल्यामुळे रेल्वे प्रशासनाने तो जुलै महिन्याच्या दुस-या आठवड्यापासून अनिश्चित कालावधीसाठी बंद केला होता. या उड्डाणपूलाचे संरक्षण कठडे पूर्णपणे मोडकळीस आलेले आहेत.त्यावरून अनेक केबल्स, पाईप नेण्यात आलेले आहेत. डांबरीकरणामुळे ६ इंच जाडीचा थर या पुलावर जमा झाला आहे.
त्यामुळे त्यावर अतिरिक्त भार पडत होता. अवजड वाहने जात असताना तो हादरत असल्यामुळे लोक जीव मुठीत घेऊन त्यावरून ये-जा करीत असत. मात्र सुदैवाने गेल्या वर्षी या पूलाशेजारी दुसरा पूल उभारल्याने या पूलावरील अतिरिक्त वाहतुकीचा भार कमी झाला होता.या पूलाची डागडुजी रेल्वे किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने करणे अपेक्षित असतांना या पूलाकडे अनेक वर्ष दुर्लक्ष केले गेले होते.