ग्रामीण भागातही रेडिमेड पुरणपोळ्यांना मागणी; महागाईची झळ, प्रति नग २०-२५ रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 11:49 PM2021-03-25T23:49:40+5:302021-03-25T23:49:52+5:30
पूर्वीच्या काळी होळीच्या सणाला ग्रामीण भागात घरोघरी पुरणपोळ्या बनवल्या जात असतं. मात्र आता नोकरी, व्यवसायानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांना यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही.
राहुल वाडेकर
विक्रमगड : पुरणपोळ्यांशिवाय होळीच्या सणाला मजा नाही. अवघ्या तीन दिवसांवर येवून ठेपलेल्या शिमगोत्सवावर यंदा कोरोनाचे सावट असले तरी घरगुती व विविध खाद्यपदार्थांच्या दुकानात रेडिमेड पुरणपोळीचे फलक झळकू लागले असून त्यांना मागणीही आहे. ग्रामीण भागातील महिलाही आता रोजगारासाठी घराबाहेर पडू लागल्याने या रेडिमेड पुरणपोळ्या घेण्याकडे त्यांचा कल दिसतो. या पोळ्यांनाही महागाईची झळ बसलेली असून गेल्या वर्षी १० ते १५ रुपयांना मिळणाऱ्या पोळीसाठी यंदा २० ते २५ रुपये मोजावे लागणार आहेत.
पूर्वीच्या काळी होळीच्या सणाला ग्रामीण भागात घरोघरी पुरणपोळ्या बनवल्या जात असतं. मात्र आता नोकरी, व्यवसायानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांना यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. परिणामी रेडिमेड पदार्थ, पोळ्या विकत घेऊन त्यात आनंद शोधला जातो. त्यामुळे ग्रामीण भागातही रेडिमेडच्या पोळ्यांना हल्ली मागणी वाढली आहे. दुकानांत व बचत गटांच्या माध्यमातून पुरणपोळ्या सहज मिळू लागल्याने होळीसाठी पोळ्यांची मागणी वाढली आहे. आगाऊ मागणीनुसार त्या जास्त प्रमाणातही उपलब्ध करून दिल्या जातात. वाढत्या महागाईमुळे दर वाढलेले आहेत. तर काही विक्रेत्यांनी शक्कल लढवत या पोळ्यांचे दर न वाढवता त्याचा आकार व वजन कमी केलेले आहे.
छोटे विक्रेते, बचतगटाचे स्टॉल याचबरोबर मिठाईच्या दुकानातूनही या पोळ्या सहज मिळतात. यंदा कोरोना, लॉकडाऊनमुळे बिघडलेले आर्थिक गणित यामुळे प्रत्येक सामान्य माणूस आधीच मेटाकुटीला आला आहे. तरीही दरवर्षीच्या तुलनेत यंदा चांगला व्यवसाय होईल, अशी विक्रेत्यांना आशा आहे.
पुरणपोळ्या तयार करणाऱ्या महिला या आधी दिवसाला १५० ते २०० रुपये रोज घेत होत्या. मात्र आता गॅसच्या किंमती व वस्तूंचेही भाव वाढले आहे. त्यामुळे पोळ्यांच्या किमतीत दरवाढ करण्याशिवाय आमच्यापुढे पर्याय नाही. अन्यथा पुरणपोळ्या बनविण्याकरीता केलेला खर्च व त्यातून मिळणारा नफा यात आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल. एक नग २० रुपये प्रमाणे ऑर्डर व विक्री केली जात आहे. - जयश्री औसरकर ,अध्यक्ष, सद्गगुरुबचत गट विक्रमगड
वारंवार होणारी वस्तूंची भाववाढ, इंधनदरवाढ, मजुरीची दरवाढ, डाळ, गुळाची दरवाढ यामुळे पुरणपोळ्याही महागल्या आहेत. पुरणपोळी बनविण्यासाठी लागणारे महत्वाचे साहित्य म्हणजे गूळ ६५ ते ७० रुपये किलो तर चण्याची डाळ ६० ते ६५ रुपये किलो आहे. त्याचबरोबर इंधन दरवाढ झाल्याने या पदार्थाच्या किमतीतही वाढ झाली आहे. - वंदना वाडेकर, गृहिणी, विक्रमगड