भीषण आग आणि एकाचा बळी जाऊनही महापालिका...; अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
By धीरज परब | Published: March 1, 2024 06:07 PM2024-03-01T18:07:07+5:302024-03-01T18:07:45+5:30
भाईंदर पूर्वेच्या आझादनगर भागातील पालिका आरक्षणाची जागा ही शहरातील मध्यवर्ती ठिकाणी मोक्याची आहे.
मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या आझादनगर भागातील मीरा भाईंदर महापालिकेच्या आरक्षणाच्या मालकी जागेत झालेल्या बेकायदा गोदाम व झोपडयांना महापालिकेनेच संरक्षण दिल्याने बुधवारी भीषण आग लागून एकाचा बळी गेला. या प्रकरणी पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे. तर दुसरीकडे आगीची घटना घडून देखील पालिका मात्र पालिकेची जागा अतिक्रमण मुक्त करण्यास अजूनही चालढकल करत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
भाईंदर पूर्वेच्या आझादनगर भागातील पालिका आरक्षणाची जागा ही शहरातील मध्यवर्ती ठिकाणी मोक्याची आहे. आरक्षणाची जागा ताब्यात घेण्यासाठी पालिकेने विकासक व जमीन मालकांना करोडो रुपयांचा मोबदला टीडीआर द्वारे दिलेला आहे. तर एका प्रकरणात अतिक्रमण असून सुद्धा एका राजकीय व्यक्तीशी संबंधिताला पालिकेने टीडीआर देण्याचा प्रताप केला असल्याचे आरोप होत आले आहेत. येथील एक पक्के मोठे अनधिकृत धार्मिक स्थळ तोडू नये म्हणून संबंधित मुंबई उच्च न्यायालयात गेले असता तेथे त्यांना दिलासा मिळाला नाही. परंतु पालिकेने अजूनही ते बेकायदा बांधकाम तोडलेले नाही.
न्यू गोल्डन नेस्ट कडे जाणाऱ्या रस्त्याच्या लगत ह्या पालिका भूखंडात मोठ्या प्रमाणात गोदामे , झोपड्या तसेच पक्की बांधकामे होऊन देखील महापालिकेचे प्रभाग अधिकारी पासून अतिक्रमणाचे वरिष्ठ अधिकारी यांनी सदर जागा मोकळी करून घेतली नाही. उलट पालिकेच्या जागेत अतिक्रमण करणाऱ्याना धंदे लावण्यास तसेच राहण्यास मोकळीक दिली.
या प्रकरणी तत्कालीन स्थानिक शिवसेना नगरसेविका तारा घरत स्नेहा पांडे आदींनी पालिके कडे आरक्षणाची जागा मोकळी करण्यासाठी तक्रारी केल्या होत्या. दोन वर्षां पूर्वी पालिकेने येथील अतिक्रमणे हटवली सुद्धा होती. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त या मोकळ्या भागात घरत , पांडे ह्या स्थानिक नगरसेविकांनी वृक्षारोपण केले होते. परंतु काही काळाने झाडे काढून टाकून माफियांनी पुन्हा अतिक्रमणे केली.
आझाद नगरच्या ह्या गोदाम , झोपड्याना पूर्वी देखील आग लागली होती. त्यातच पालिकेच्या मालकीची जागा असल्याने येथील अतिक्रमणे हटवली असती तर बुधवारची भीषण आग लागून एकाच बळी गेला नसता. लोक जखमी झाले नसते व लोकांचे आगी मुळे झालेले नुकसान टळले असते. शिवाय आग विझवण्यासाठी इतकी मोठी यंत्रणा लागली नसती.
शैलेश पांडे ( प्रवक्ता , भाजपा ) - स्थानिक नगरसेविका ताराताई घरत व स्नेहा पांडे यांच्या तक्रारी नंतर पालिका आरक्षणातील अतिक्रमण दूर करून घेतले व वृक्षारोपण केले होते. परंतु पालिकेच्या अधिकाऱ्यांना पालिकेच्या मालकीची जागा सुद्धा संरक्षित ठेवायची नाही हे शहराचे दुर्दैव आहे. भीषण आग लागून जीव जाण्यास पालिकेचे प्रभाग अधिकारी व अतिक्रमण विभाग जबाबदार असून त्यांना निलंबित करून गुन्हा दाखल करा. ज्या लोकांचे आगीत नुकसान झाले त्याचा खर्च ह्या अधिकारी व पालिके कडून वसूल करावा.
कृष्णा गुप्ता ( अध्यक्ष , सत्यकाम फाऊंडेशन ) - शहराच्या मध्यवर्ती असलेल्या ह्या भागात मोठ्या प्रमाणात झाडे लावून परिसरातील प्रदूषण कमी करण्या ऐवजी महापालिका आणि काही राजकारणी मात्र पालिकेच्या मालकी जागेवरच अतिक्रमण करण्यास संरक्षण देत आले आहेत. त्यामुळे आगीच्या घटनेला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.