ऐन मार्चमध्ये वसई-विरारला वाढली पाणी टँकरची मागणी! दरातही झाली वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 11:48 PM2021-03-22T23:48:19+5:302021-03-22T23:48:34+5:30
बहुतांश ठिकाणी पाणीटंचाईच्या झळा
प्रतीक ठाकूर
विरार : मार्च महिना अर्धा संपत नाही तोच वसई-विरारच्या शहरी भागांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. परिणामी टँकरने पाणी विकत घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असल्याने टँकरची मागणी आणि त्याच्या दरातही वाढ झाली आहे.
वसई-विरार शहरातील नागरिकांना पालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो; परंतु काही ठिकाणच्या भागात पालिकेतर्फे पुरविले जाणारे पाणी अपुऱ्या प्रमाणात येत आहे, तर काही भागांत अजूनही पाणी उपलब्ध झालेले नाही. येथील पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. परिणामी टँकरची मागणी वाढत आहे.
वसई-विरार शहरात एक हजारांहून अधिक टँकर आहेत. हे टँकर विरार पूर्व-पश्चिम, नालासोपारा पूर्व, वसई पूर्व, नायगाव यासह विविध ठिकाणच्या भागात पाणीपुरवठा करतात. जेथे एका टँकरची गरज होती त्या ठिकाणी दोन टँकर मागवावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. जे टँकर १ हजार २०० रुपयांना मिळत होते; तेच टँकर आता १५०० ते १७०० रुपयाने विकले जाऊ लागले आहेत. काही ठिकाणी दोन हजारांहून अधिक रक्कम त्यासाठी मोजावी लागत आहे. जेथे पाणी उपसा होतो; अशा ठिकाणच्या विहिरी व बोअरवेल यांची भूजल पातळी खालावली आहे. आधीच कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने जे पाणी विक्री करतात; तेथे पाण्याचे दर वाढतात. त्यामुळे टँकरचे दरही वाढले असल्याचे टँकरमालकांनी सांगितले.
ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा करा !
महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ८९ मधील कामण, चिंचोटी, देवदल, गिदराई (सातिवली) या परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गिदराईपाडा येथील ग्रामस्थांनी नळकनेक्शनसाठी पैसे भरूनही नळकनेक्शन दिले जात नाही. कामण दलित वस्ती योजना एक वर्षापासून बंद आहे. येथील लघुपाटबंधारे (ग्रामपंचायत काळातील) पाणीपुरवठा योजना बंद आहे. कामण, चिंचोटी, देवदळ येथे दोन महिन्यांपासून रस्ते खोदून जलवाहिनी टाकली आहे. परंतु पाणीपुरवठा केला जात नाही. पालिकेने येथील पाणीप्रश्न मार्गी लावा; अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा माजी नगरसेविका प्रीती म्हात्रे यांनी पालिकेला दिला आहे.