पालघरमधून आणखी २४०० मजुरांची परराज्यांत रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 07:00 AM2020-05-11T07:00:01+5:302020-05-11T07:00:43+5:30
पालघर तालुक्यातून ८०० तर बोईसर भागातून ४०० अशी एकूण १ हजार २०० कामगारांनी तहसीलदार सुनील शिंदे यांच्याकडे अर्ज सादर केले होते.
पालघर : जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या मजूर व कामगारांसाठी रविवारी पालघरमधून एक आणि वसई रोड स्थानकातून एक अशा दोन विशेष गाड्या सोडण्यात आल्या. मध्य प्रदेशातील झाबुवा येथील १२०० लोकांना त्यांच्या मूळ गावी घेऊन पालघर रेल्वे स्थानकातून एक ट्रेन रात्री ९ वाजता, तर वसई रोड स्थानकातून उत्तर प्रदेशातील जौनपूरकडे १२०० प्रवाशांना घेऊन एक ट्रेन सायंकाळी ७ वाजता रवाना झाली.
पालघर तालुक्यातून ८०० तर बोईसर भागातून ४०० अशी एकूण १ हजार २०० कामगारांनी तहसीलदार सुनील शिंदे यांच्याकडे अर्ज सादर केले होते. या अर्जांची छाननी करून ती सर्व कागदपत्रे मध्य प्रदेश शासनाकडे पाठविली. या सर्व प्रवाशांचा खर्च मध्य प्रदेश सरकारने उचलला असून त्यांच्याकडून मान्यता मिळाली. रविवारी जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश जारी झाल्याने यादीत नाव असलेल्या प्रवाशांव्यतिरिक्त इतरांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवला होता. रविवारी रात्री ९च्या सुमारास या विशेष गाडीला जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, तहसीलदार शिंदे आदींनी झेंडा दाखविल्यानंतर ट्रेन मध्य प्रदेशकडे रवाना झाली.
ंवसईतून १२०० मजूर जौनपूरच्या दिशेने
वसई : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या उत्तर प्रदेशातील १२०० कामगार व मजुरांना घेऊन वसई रोड ते जौनपूर ही विशेष रेल्वेगाडी रविवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास रवाना झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे वसई प्रांताधिकारी स्वप्निल तांगडे यांनी ‘लोकमत’ला दिली. वसई, विरार व जिल्ह्याच्या विविध भागांतील मजुरांना शनिवारी व रविवारी सनसिटीच्या मैदानात जमा होण्यास सांगण्यात आले. तिथे त्यांना जेवण, नाश्ता, प्रवासासाठी खाणे देऊन बसने वसई स्थानकात आणले गेले. तिथे आरोग्य तपासणी करून मास्क सॅनिटाईज करून गाडीत प्रवेश दिला गेला. वसई व जिल्ह्यातील विविध भागातील या कामगार-मजुरांना घेऊन या आठवड्यातील ही २२ डब्यांची दुसरी विशेष गाडी दुपारी २.३० वाजता सुटणार होती, मात्र सर्व १२०० मजूर कामगार यांची रीतसर तपासणी व व्यवस्थापन करेपर्यंत वेळ गेल्याने अखेर ही गाडी संध्याकाळी ७.०० च्या सुमारास रवाना झाली.