निराधार योजनेतील लाभार्थी अनुदानापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 01:06 AM2019-09-23T01:06:16+5:302019-09-23T01:06:24+5:30
चार महिन्यांपासूनची परिस्थिती : दररोज मारतात बँकेत हेलपाटे
डहाणू : गरिबी हटवण्यासाठी, तळागाळातील गरीब लोकांसाठी असलेल्या योजनांची जाहिरातबाजी केली जात असली तरी लाभार्थी मात्र प्रत्यक्ष लाभापासून वंचित आहेत.
डहाणू तालुक्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी निराधार, वृद्धापकाळ, श्रावणबाळ, तसेच राष्ट्रीय कुटुंब सहाय्य योजने अंतर्गत, वृद्ध, अपंग, दिव्यांग, अविवाहित महिला, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, कुष्ठरोगी, निराधार, अशा दारिद्र रेषेखालील १२ हजार लाभार्थ्यांचे अनुदान चार महिन्यांपासून त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले नाही. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
समाजातील दीनदुबळे, मागासवर्गीय, विमुक्त आणि भटक्या जाती, जमाती, इतर मागासवर्गीय, तसेच वृद्ध, अपंग, दिव्यांग, अविवाहित, क्षयरोगी, घटस्फोटीत, परित्यक्ता, कुष्ठरोगी, एड्सग्रस्त व्यक्तींना केंद्र आणि राज्य सरकारकडून दरमहा चारशे, आणि सहाशे रुपये अर्थसहाय्य दिले जात होते. सरकारने गाजावाजा करून त्यात वाढ करत ते सरसकट १००० रुपये केले. मात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर जून महिन्यापासून अनुदानच जमा झाले नाही.
लाभार्थ्यांच्या म्हणण्याप्रमाणे, काही लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मंजूर होऊन दोन दोन वर्षे झाली, तरीही नियोजनाच्या आणि कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे, लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर अनुदान वेळेवर जमा केले गेले नाही.
डहाणूच्या आदिवासी भागातील शेवटच्या टोकावर असलेल्या दिवशी, दाभाडी, चळणी, सुखड आंबा, चिंचले, निंबापुर, गांगोडी, वांगर्जे, शेनसरी, कोसेसरी, मोडगाव, वंकास, महालक्ष्मी, तर किनारपट्टी भागातील चिंचणी, वाणगाव, वाढवण, वरोर, धाकटी डहाणू, अशा लांबवरच्या गावांतील गरजवंत लाभार्थी रोज बँकेच्या दारात येऊन हेलपाटे मारीत आहेत.
निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे जून, जुलै महिन्याचे अनुदान बँक खात्यात भरणा करण्याचे काम सुरू असून, आॅगस्ट, सप्टेंबर महिन्याच्या अनुदानाची मागणी करण्यात आली आहे.
- राहुल सारंग, तहसीलदार, डहाणू