वंचितांनी सोपाऱ्यात फोडली जलवाहिनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 10:42 PM2019-07-22T22:42:23+5:302019-07-22T22:42:44+5:30
बिनधास्त पाणीचोरी : चोरटयांना मुबलक प्रामाणिक करदात्यांच्या नशिबी मात्र सततची निर्जळी
आशिष राणे
वसई : नालासोपारा शहरात वसई विरार महापालिकेची वाहिनी फोडून पाण्याची बिनधास्त चोरी केली जात आहे. यामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असून जलवाहिनी फोडून केली जाणारी पाणी चोरी दिवसेंदिवस महापालिकेची डोकेदुखी ठरत आहे. तर या पाणीचोरीच्या समस्येवर तोडगा म्हणून स्थापन केलेले फिरते पथक नेमके शहरात कुठे आणि काय काम करते आहे, कुठे व कशी गस्त घालत काम करते आहे. याचा शोध आता स्वत: पालिका आयुक्तांनीच घ्यायला हवा.
दरम्यान वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाºया धरणात आता कुठे पाऊस पडल्याने मुबलक पाणी जमा झाले असले तरी शहराच्या अनेक भागांत अजूनही नळजोडण्या नसल्याने तेथे पाण्याची मात्र भीषण टंचाई आहे. नालासोपारा पूर्व परिसरात आज ही केवळ हंडाभर पाण्यासाठी लोकांना पाण्याची चोरी करावी लागत आहे. ही वस्तुस्थिती आहे. तर नालासोपारात संतोष भुवन, डहाणू बाग, वाकण पाडा, श्रीराम नगर, बिलालपाडा गावराई पाडा पेल्हार या परिसरात महापालिकेचा पाणी पुरवठा अद्यापही सुरू झालेला नाही. यामुळे या विभागातील लोकांना एक तर पाणी विकत घ्यावे लागते अथवा पाण्यासाठी वाहिनी फोडून पाण्याची चोरी करावी लागत आहे. बिलाल पाडा येथे व्हॉल्व्ह तोडून स्थानिक पाणी भरत आहेत तर श्रीराम नगर येथे त्यांनी जलवाहिनीच्या व्हॉल्व्ह जवळच सिमेंटचे बांधकाम करून पाईप लाइन टाकली आहे. येथून पिण्यासाठी पाणी तर भरले जातेच, शिवाय कपडे आणि गाड्याही धुतल्या जात आहेत.
पाणीपुरवठा विभाग कोमात
दरवेळी अधिकारी वर्ग आम्ही असे प्रकार आढळून आले तर तातडीने कारवाई करतो, पण या विभागात लोक वारंवार जलवाहिनी फोडत आहेत व पालिका व त्यांचे फिरते गस्ती पथक नेमकं कुठं काम करीत आहेत. हे मात्र स्वत: शहर अभियंता माधव जवादे यांना सुध्दा माहीत नाही, हे मात्र नवल आहे.
वसई-विरारमध्ये कमी दाबाने पाणी
वसई : वसई विरार शहर महानगरपालिकेस पाणी पुरवठा करणाºया सूर्या धरणाच्या नवीन योजनेची पाईप लाईन धुकटन फिल्टर प्लांट येथे शनिवारी दुपारच्या सुमारास नादुरु स्त झाल्याने पालिकेने तात्काळ तिच्या दुरु स्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू करून सदरचे काम रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आले. दरम्यान महापालिकेची नवीन सूर्या योजना वगळता फक्त जुन्या योजनेतून पाणी पुरवठा सुरू होता. तर रविवारी रात्री पासून या दोन्ही योजनेतून पाणी पुरवठा चालू झाला असून अधून मधून महावितरण च्या वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्यामुळे ही येथील पाणी पुरवठा अनियमित होत आहे. किंबहूना जलवाहिनी दुरु स्ती आणि वीज पुरवठा खंडित होणे ह्या दोन्ही कारणांमुळे रविवारी व पुढील दोन दिवस वसई विरार शहरात होणारा पाणी पुरवठा अनियमित होणार आहे.