पाच नद्यांचे वरदान लाभूनही वाडा तालुका तहानलेलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 12:55 AM2021-03-07T00:55:02+5:302021-03-07T00:55:25+5:30

महिलांच्या डोक्यावर पुन्हा हंडा-कळशी

Despite the blessings of five rivers, Wada taluka is still thirsty | पाच नद्यांचे वरदान लाभूनही वाडा तालुका तहानलेलाच

पाच नद्यांचे वरदान लाभूनही वाडा तालुका तहानलेलाच

Next

वसंत भोईर
वाडा : तालुक्यात बारमाही मुबलक पाणी असणाऱ्या वैतरणा, तानसा, पिंजाळ, देहजे, गारगाई या पाच नद्यांचे वरदान वाडा तालुक्याला लाभले आहे. दोन खासदार तीन आमदार या तालुक्याला लाभले असूनही या पाण्याचा लाभ तालुक्याला होत नाही. तालुक्याला मुबलक प्रमाणात पाणी मिळवून देणारे लोकप्रतिनिधी न मिळाल्याने तालुक्यातील अनेक गावांतील महिलांना डोक्यावर हंडा घेऊन वणवण फिरावे लागत आहे. 

वाडा तालुक्यात १६८ खेडी २००च्या आसपास पाडे, तर ८६ ग्रामपंचायती आहेत. तीन लाखांच्या आसपास तालुक्याची लोकसंख्या आहे. तालुक्यात काही प्रमाणात उद्योगधंदे वाढल्याने लोकसंख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे मार्चच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. 
वाड्यात औद्योगिकीकरणामुळे  रोलिंग मिल्स, बाटलीबंद पाण्याच्या कंपन्यांना पाण्याची मोठी गरज असल्याने पाण्याचा उपसा होत आहे. त्यासाठी खासगी कूपनलिकेत टॅंकरने पाण्याचा उपसा केला जात आहे. एकट्या कोकाकोला कंपनीला दररोज लाखो  लिटर पाणी लागते. हे पाणी वैतरणा नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यातून कंपनी उचलते.  

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कुंभाची क्षमता १२ लाख लिटर एवढीच आहे. ४० हजार लोकसंख्या आहे. २० लाख लिटर वाडा शहरासाठी पाणी दररोज लागते. एका व्यक्तीला साधारण ५५ लिटर पाणी लागते. त्यामुळे आठ लाख लिटर पाणी वाडा शहराला दररोज कमी पडत असल्याने नागरिकांना पाणीटंचाई जाणवत आहे. वाडा नगरपंचायतीत तीन वर्षांत तीन पाणीपुरवठा सभापती बदलले. नव्याने आलेले सभापती संदीप गणोरे यांनीही अपेक्षाभंग केला. शहराचा काही भाग चढउताराचा  आहे. काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. उंच भागावर असलेल्या विवेकनगर, शिवाजीनगर, सोनारपाडा, मोहट्याचापाडा या भागात पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. १९९ मध्ये सुरू झालेली ही नळयोजना वाढत्या नगरांना पाणीपुरवठा करणार तरी कशी? त्यामुळे या नगरातील नागरिकांना कूपनलिकेच्या पाण्यावर विसंबून राहावे लागत आहे. 

गरीब जनतेला टॅंकरचा आसरा
गरीब जनतेला टॅंकरचा आसरा घ्यावा लागत आहे. नगरपंचायतीच्या  कराचा नियमित भरणा करणाऱ्या नागरिकांना टंचाई, तर कर बुडवणाऱ्यांना मुबलक पाणीपुरवठा अशी परिस्थिती नगरपंचायतीत असल्याचे शिवाजीनगर येथील रहिवासी दामोदर पाटील यांनी सांगितले.  पश्चिम वाड्याला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी माझे प्रयत्न सुरू असल्याचे भाजपचे नगरसेवक मनीष देहरकर यांनी सांगितले.

Web Title: Despite the blessings of five rivers, Wada taluka is still thirsty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.