खासदार, आमदारांना सतत सांगूनही दातीवरेत महिन्यातून एकदाच पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 01:01 PM2024-04-03T13:01:20+5:302024-04-03T13:02:02+5:30
पालघर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे सत्ताधारी पक्षाचे खासदार राजेंद्र गावित आणि बहुजन विकास आघाडीचे बोईसरचे आमदार राजेश पाटील हे दोन मोठे नेते असूनही यांच्या मतदारसंघातील पालघर तालुक्यात दातीवरे गावात महिन्यातून एकदाच पाणी येते.
- हितेन नाईक
पालघर - पालघर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे सत्ताधारी पक्षाचे खासदार राजेंद्र गावित आणि बहुजन विकास आघाडीचे बोईसरचे आमदार राजेश पाटील हे दोन मोठे नेते असूनही यांच्या मतदारसंघातील पालघर तालुक्यात दातीवरे गावात महिन्यातून एकदाच पाणी येते. खड्डा खणून तहान भागवावी लागते. गेल्या चार-पाच वर्षांपासून हीच परिस्थिती असून आमदार-खासदारांकडे तक्रारी करुनही ग्रामस्थांची पाण्यासाठीची वणवण थांबलेली नाही.
केळवा माहीम प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना १७ गावांसाठी बनवलेली आहे. १९८० मध्ये सुरू झालेल्या या योजनेतील अडचणींबाबत निवेदने, आंदोलने करूनही समस्यांकडे पाणीपुरवठा विभागाने लक्ष न दिल्याने रडतखडत ही योजना नावापुरची सुरू आहे. योजनेत दातीवरे हे शेवटचे गाव. माहीम, केळवे, माकुनसार, दांडा खटाळी, आगरवाडी, खर्डी, नगावे, वाकसई, तिघरे, अंबोडे, कोरे, वेढी, डोंगरे, मथाने, एडवण, भादवे आणि विळंगी गावांचा समावेश आहेत.
जमिनीत खड्डा खणून भागवावी लागते तहान
गावातील ८५ वर्षीय ज्येष्ठ महिला मंजुबाई वसईकर यांच्यासह गावातील अनेक नागरिकांना जमिनीत खड्डा खणून त्यातून पाणी घ्यावे लागते. दूषित पाण्यामुळे आजारही होतात. उपचारासाठी सात किलोमीटरवर एडवन प्राथमिक आरोग्य केंद्रात पायीच जावे लागते, असे ग्रामस्थ जितेंद्र तांडेल यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
माझ्याकडे ग्रामस्थांच्या तक्रारी आल्या होत्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे उपाययोजनांसाठी सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने नवीन योजना कार्यान्वित केली जात आहे.
- राजेंद्र गावित, खासदार, शिंदेसेना
गळतीमुळे योजनेतील शेवटचे गाव असलेल्या दातीवरे पर्यंत पाणी पोहोचत नाही. त्यासाठी जीवन प्राधिकरण मार्फत १८ कोटींची योजना सुरू आहे. तात्पुरत्या स्वरूपात टँकरद्वारे पाणी पोहोचविण्याची व्यवस्था करतो.
- आ. राजेश पाटील, बोईसर
पाणीबिलाच्या रकमेचा गैरव्यवहार
वेढी गावाचा पाणीपुरवठा बंद असून अन्य १६ गावांची ९८ लाख ७२ हजार ७१५ रुपयांची पाण्याची थकबाकी असल्याचे पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंते संतोष शिरसीकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
दातीवरे ग्रामस्थांनी भरलेल्या रकमेचा ग्रामपंचायतीकडून गैरव्यवहार झाल्याची तक्रार मनसेचे तालुका उपाध्यक्ष चेतन वैद्य यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.
जलजीवन मिशनअंतर्गत नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. त्याचे काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पालघर विभागाकडून अजूनही पाइप टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे दातीवरे गावाला नियमित पाणी येण्यास किमान वर्षभर वाट पाहावी लागेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.