सहा निवडणुका झाल्या तरी पालघरच्या समस्या जैसे थे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 12:06 AM2019-10-13T00:06:05+5:302019-10-13T00:06:29+5:30
मतदार समस्यांच्या गर्तेतच। जाहीरनाम्यातील आश्वासने तीच फक्त बदलले ते उमेदवार, पक्ष
पंकज राऊत।
लोकमत न्यूज नेटवर्क
बोईसर : पूर्वाश्रमीचा ठाणे व २०१४ पासून पालघर जिल्ह्यामध्ये लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपरिषद व ग्रामपंचायतीच्या अनेक निवडणुका झाल्या. यात प्रामुख्याने लोकसभा व विधानसभेच्या दहा वर्षांत सहा निवडणुका झाल्या. या प्रत्येक निवडणुकीमध्ये विविध पक्ष व संघटनानी वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात भरभरून आश्वासन दिली. परंतु, बहुसंख्य प्रश्न व समस्या आजही कायम असल्याने प्रत्येक निवडणुकीमध्ये जाहीरनाम्याद्वारे दिलेल्या आश्वासनांचे काय? असा प्रश्न मतदार व नागरिक संतप्तपणे प्रश्न विचारत आहेत
वेध प्रश्नांचा :
निवडणूक म्हटली की प्रत्येक राजकीय पक्ष, संघटना व त्यांचे उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते आपण केलेल्या विकासाचे पाढे वाचायला सुरुवात करून विकास कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतात. वास्तवात पालघर जिल्ह्यात आतापर्यंत ज्या निवडणुका घेण्यात आल्या त्या निवडणुकांसारखीच २१ आॅक्टोबरला घेण्यात येणारी निवडणूक असून हा एक पुढचा अंक असल्याने आता पुन्हा जुनी व तीच ती आश्वासने घेऊन उमेदवार दारोदारी प्रचाराकरीता येत आहेत.
प्रत्येक निवडणुकीमध्ये नागरिक समस्यांचा पाढा वाचतात. तेव्हा मात्र नेते मंडळी गाजर दाखवून नंतर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. त्यामुळे पालघर जिल्ह्याच्या बहुसंख्य भागात विकासाचे घोंगडे वर्षानुवर्ष भिजत असून विकासाचे चित्र सर्वत्र विदारक आहे. याकडे कोण व केव्हा गंभीरपणे लक्ष देणार?
पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आदिवासींना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी व मजुरीसाठी आजही भटकंती करावी लागते. आजही काही भागात शिक्षणाची पुरेसी सोय नाही. कुपोषण, आश्रम शाळांची दुरवस्था, निकृष्ट दर्जाचे रस्ते, वाढीव वीज बिलांचा गोंधळ, विजेच्या प्रचंड समस्या, सार्वजनिक दळणवळणाचे भयावह वास्तव, वाहतूककोंडी, प्रदूषण, अपुऱ्या लोकल सेवा व आरोग्य सेवेचा उडालेला बोजवारा यामुळे आज शहरी, ग्रामीण व दुर्गम भागातील सर्वच नागरिक त्रस्त असून त्या समस्यांचे चित्र बदलण्याची अपेक्षा आहे.
२००९ व २०१४ ची विधानसभा निवडणूक तर लोकसभेची २००९, २०१४, २०१८ (पोट निवडणूक) २०१९ अशा विधानसभेच्या दोन लोकसभेच्या चार अशा दहा वर्षात एकूण सहा निवडणुका झाल्या तरी राजकीय पक्षांनी प्रत्येक निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात दिलेल्या वचनांची आणि आश्वासनांची पूर्तता झाली का? या प्रश्नांचे उत्तर मतदार नाही, असेच देताना दिसतात.
बोईसर विधानसभा क्षेत्रात कॉस्मोपॉलिटन लोकवस्ती असून देशातील सर्व राज्यामधील नागरिकांबरोबरच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत. या विधानसभा क्षेत्राच्या भौगोलिक स्थितीचा विचार केल्यास शहरी, निमशहरी ग्रामीण, अति ग्रामीण, (दुर्गम) डोंगरी व समुद्र आणि खाडी किनारपट्टीचा भाग अशा विविध भागांमध्ये हा मतदारसंघ विभागला गेला असून प्रत्येक भागातील वैयक्तिक, सामाजिक व सार्वजनिक प्रश्न व समस्या वेगवेगळ्या आहेत. या मतदारसंघांमध्ये सुमारे ३३८ बूथ तर सुमारे पावणेतीनशे गावांचा समावेश आहे. जातीय रचनेबरोबरच भौगोलिक रचना जशी वेगळी आहे, तसे प्रत्येक ठिकाणच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक वेळी वेगवेगळा पक्ष या समस्या सोडवण्याचा दावा करतो. मात्र, प्रत्यक्षात या राजकीय पक्षांच्या कामाला, प्रचाराला मतदार कसा प्रतिसाद देतात ते येणाºया निवडणुकीतून निश्चितच कळेल.
रस्त्यांची दुरवस्था
च्राज्य व राष्ट्रीय महामार्ग काही प्रमाणात सोडले तर अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था प्रचंड भयावह आहे. तलासरी, चारोटी, चिल्हार फाट्यापासून वसई घोडबंदरपर्यंतच्या महामार्गावर अनेक अपघात प्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) आहेत. त्यामुळे अनेक जीवघेणे अपघात नेहमी होऊन त्यामध्ये निष्पापांचे बळी जात असूनही दुर्लक्ष आहे. रस्ता कंत्राटदारांची लॉबी मजबूत झाली असून ते कुणालाही जुमानत नाहीत.
वाहतूककोंडीची समस्या
सूर्या नदीवरील महत्त्वाच्या पुलाचे आणि तारापूर एमआयडीसी ते राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा आणि २४ तास प्रचंड अवजड वाहतुकीचा बोईसर-चिल्हार रस्त्याच्या कामाबरोबरच या रस्त्यालगतच्या जमिनीचा प्रश्न तातडीने सोडविणे गरजेचे होते.
तारापूरचे प्रदूषण
मिटणार के व्हा
तारापूर औद्योगिक वसाहत प्रदूषणामध्ये संपूर्ण भारतात पहिल्या क्रमांकावर येवूनही प्रदूषणाची परिस्थिती आजही स्थिती जैसे थे आहे. उद्योगाकडून पर्यावरणाचे नियम अक्षरश: पायदळी तुडविले जात असतानाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह कुणाचाही अंकुश नाही.
धरण उशाला
कोरड घशाला
बोईसरची लोकसंख्या आवाक्याबाहेर गेल्याने नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी बोईसर ग्रामपंचायतीची क्षमता नसतानाही बोईसर नगर परिषद स्थापने संदर्भात निर्णय घेण्याची मानसिकता कुणी दाखवित नाही. पाण्याची गंभीर समस्या सर्वत्र आहे. विशेष म्हणजे याच परिसरातून पाणी वसईला जाते, परंतु येथील गावे आजही पाण्याने तहानलेली आहेत. ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे.