रेती माफियांना दणका कोटींची सामग्री उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 02:25 AM2018-07-24T02:25:01+5:302018-07-24T02:25:04+5:30
३ जेसीबी, ४ गॅस कटरचा वापर; ३०० ब्रास रेती टाकली पुन्हा खाडीत
वसई : विधानपरिषदेत लक्षवेधी सादर झाल्यानंतर आधी पालघर जिल्हा प्रशासनाचे बंद डोळे उघडले आण ित्यानंतर आता तालुका स्तरावर वसई प्रांत व तहसीलदार यांनी विरार-शिरगाव येथील बंदरावरील रेतीमाफीयांंच्या मुसक्या आवळून कोट्यवधींचा महसूल मुद्देमालासहित जप्त केला असल्याची माहिती वसई प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर यांनी दिली आहे.
दरम्यान पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार विरारच्या शिरगाव रेती बंदरावर वसई प्रांत यांच्या मार्गदर्शनखाली वसई तहसीलदारांनी दि.२१ व २२ जुलै या दोन्ही दिवशी दिवस रात्र धाडसत्र सुरु केले होते.
या एकूणच कारवाईत १ करोड रुपयांचे ८ सक्शन पंप आणि ५ बोटी जप्त करण्यात आल्यावर वसई तहसीलदार किरण सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली विरार शिरगाव बंदरावर कारवाईत ३ जेसीबी, ४ गॅस कटरच्या साहाय्याने रेती बंदरावरील २६ कुंड्या, ४ झोपड्या उध्वस्त करून जप्त सक्शन पंप जाळून आणि त्यांची तोडफोड करून ते उद्ध्वस्त ही करण्यात आल्या.
यामध्ये जवळपास ३०० ब्रास रेती साठा पुन्हा शिरगाव खाडीत ढकलून देण्यात आला, दोन दिवस सुरु असलेल्या या धडक कारवाई साठी वसई प्रांतांसमवेत तहसीलदारांच्या उपस्थितीत झालेल्या कारवाईत पोलीस व महसूल विभागाचे १०० हून अधिक अधिकारी- कर्मचारी सहभागी झाले होते.
पालघर व वसई तालुका महसूल प्रशासनाने अती दुर्लक्ष केल्यानंतर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन व नागरिकांच्या तक्रारीवरून आमदार विनायक मेटे यांनी नागपूर अधिवेशनात नुकतीच लक्षवेधी सादर केल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले.
मात्र अजूनही हजारो ब्रास रेतीसाठा हा वसई तालुक्यातील विविध बंदरावर असल्याची माहिती समोर येत आहे. त्याबाबत कधी कारवाई होते याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे.