शिवसेनेने जनमताशी बेईमानी केली, देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 02:58 PM2020-01-01T14:58:13+5:302020-01-01T16:05:30+5:30
भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या मेळावा आज पालघरमध्ये झाला. यावेळी मुख्यमंत्रिपदावरून झालेला वाद आणि युती तुटण्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. '
पालघर - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी युती तोडण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. राज्यातील जनतेने युतीला जनमत दिले होते. मात्र शिवसेनेने या जनमताशी बेईमानी केली. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री करू असा शब्द दिला होता. मात्र हा मुख्यमंत्री शिवसेनेच्या पाठिंब्यावर बनवू, असा शब्द दिला होता का? असा सवाल देवेंद फडणवीस यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.
भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या मेळावा आज पालघरमध्ये झाला. यावेळी मुख्यमंत्रिपदावरून झालेला वाद आणि युती तुटण्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. ''राज्यातील जनतेने युतीला जनमत दिले होते. मात्र शिवसेनेने या जनमताशी बेईमानी केली. शिवसेना या थराला जाईल असे वाटले नव्हते. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री करू असा शब्द दिला होता. मात्र हा मुख्यमंत्री शिवसेनेच्या पाठिंब्यावर बनवू, असा शब्द दिला होता का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. तसेच वर्गात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला बाहेर बसवण्यात आलं आहे, अशी खंतही फणडवीस यांनी व्यक्त केली.
Interacting at the ‘BJP Karyakarta’ melava for Palghar Zilha Parishad Election 2020 in Palghar https://t.co/TQfSPYlUSO
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 1, 2020
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरूनही राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारवर घणाघाती टीका केली. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ, सातबारा कोरा करू अशी आश्वासने जनतेला देण्यात आली होती. मात्र त्यातील कशाचीही पूर्तता झालेली नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केवळ जनादेशाशीच नव्हे तर जनतेशीही प्रतारणा केली आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.