अबब..! देवमासा अडकला जाळ्यात, बोटमालकाने जाळे कापून नुकसान सहन करीत दिले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 09:14 AM2021-05-14T09:14:24+5:302021-05-14T09:14:47+5:30
मच्छीमारीसाठी समुद्रात गेलेल्या मच्छीमार बोटीच्या जाळ्यात अचानक अडकलेल्या महाकाय देवमाशाला जीवनदान देण्याचे मच्छीमारांनी ठरवले.
वसई : भाईंदरच्या उत्तन समुद्रात बुधवारी मासेमारीसाठी गेलेल्या सहारा बोटीच्या जाळ्यात देवमासा अडकल्याची माहिती समोर आली आहे. उत्तनच्या समुद्रात सापडलेला हा देवमासा अंदाजे १५ ते २० फूट लांब होता. इतका मोठा मासा जाळ्यात आल्याने बोटीवरील मच्छीमारांची एकच तारांबळ उडाली. या देवमाशाचे वजन सुमारे १५०० किलो असल्याचेही सांगितले जात आहे.
मच्छीमारीसाठी समुद्रात गेलेल्या मच्छीमार बोटीच्या जाळ्यात अचानक अडकलेल्या महाकाय देवमाशाला जीवनदान देण्याचे मच्छीमारांनी ठरवले. त्याला सोडवण्यासाठी मच्छीमारांनी दोन तास शर्तीचे प्रयत्न केले. अखेर दोन तासांच्या प्रयत्नांनंतर मच्छीमारांनी अक्षरशः जाळे कापून त्याची सुटका केली. दरम्यान, देवमाशाला जीवदान देणाऱ्या बोटमालक डेव्हिड गऱ्या यांच्या बोटीचे व जाळ्याचे मोठे नुकसान झाले आहे.