दुर्दैवी! महालक्ष्मी गडावर दर्शनासाठी गेलेल्या भक्ताचा हृदयविकाराने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 05:44 PM2021-10-07T17:44:00+5:302021-10-07T17:45:19+5:30
बोर्डी वनपरिक्षेत्रात ते लेखापाल म्हणून कार्यरत होते. पायऱ्या चढून ते गडावर गेले होते, मात्र मंदिर प्रवेशापूर्वीच अस्वस्थता वाढून त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोर्डी : राज्य शासनाने गुरुवारी मंदिर प्रवेश खुला केल्यानंतर डहाणूतील महालक्ष्मी गडावर सकाळी देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या गंजाड गावातील नवनाथ येथील वसंत गो. थोरगा (वय ४७) यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. अन्य भक्तांनी मोबालद्वारे ही माहिती थोरगा यांच्या कुटुंबीयांना दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
गुरुवारी घटस्थापनेच्या औचित्यावर राज्य शासनाने मंदिरे उघडण्याला हिरवा कंदील दिला. त्यामुळे महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी सकाळच्या सुमारास थोरगा हे गडावर गेले होते. पालघर जिल्ह्यात ढगांचा गडगडाट व पावसाची शक्यता वर्तवली असून, ऑक्टोबर हिटमुळे वातावरणात प्रचंड गर्मी जाणवत आहे. त्यामुळे थकवा व घामाच्या धारा वाहतात. पायऱ्या चढून ते गडावर गेले होते, मात्र मंदिर प्रवेशापूर्वीच अस्वस्थता वाढून त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला.
अन्य भक्तांनी हा प्रकार पाहून थोरगा यांच्या मोबाइल फोनमधील संपर्क क्रमांकाद्वारे कुटुंबीयांना ही माहिती दिली. त्यानंतर त्यांचे शव कासा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. ते १९९६ पासून डहाणू वनविभागाचे कर्मचारी होते. बोर्डी वनपरिक्षेत्रात ते लेखापाल म्हणून कार्यरत होते. शासनाने मंदिरांचे दरवाजे खुले केल्याने डहाणूच्या महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी भक्तांकडून पसंती दिली जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे.