कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला मृत्यूच्या दारात नेण्यात मधुमेह, उच्च रक्तदाब आजार सर्वात पुढे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 12:44 AM2021-05-03T00:44:08+5:302021-05-03T00:44:18+5:30
आता ‘डेथ ऑडिट’ होणार, डाॅक्टर जबाबदार ठरणार!
जगदीश भोवड
पालघर : जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढण्याबरोबरच मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्यात प्रामुख्याने मधुमेह, उच्च रक्तदाब असणाऱ्यांना याचा जास्त त्रास होत असल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात होणाऱ्या मृत्यूंचे परीक्षण (डेथ ऑडिट) होणार असून ग्रामीण भागातील डॉक्टर्सकडून कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांवर योग्य उपचार न केल्याने त्यांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी खालावून त्यांचा मृत्यू होत असल्याने त्याला प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या खाजगी डॉक्टरांना जबाबदार धरून कारवाईचे आदेशवजा पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहे.
पालघर जिल्ह्यात आजवर कोरोनामुळे बाधित झालेल्यांची संख्या ८९ हजारांवर गेली असून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या दीड हजारच्या पुढे गेली आहे. कोरोना काळात पहिल्या लाटेत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जास्त नव्हती, मात्र आता दुसऱ्या लाटेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात इतर आजार असलेल्यांची प्रतिकार शक्ती कमी असल्याने ते कोरोनाचे बळी ठरत असल्याचेही दिसून आले आहे.
या पार्श्वभूमीवर पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे तसेच पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या स्वाक्षरीने नुकतेच खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना एक पत्र जारी करण्यात आलेले असून, या पत्रात कोरोना रुग्णांची योग्य तपासणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. हे पत्र तालुका प्रशासनाच्या माध्यमातून सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांपर्यंत पोहचविण्यात आले आहे.
कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण खाजगी डॉक्टरांकडे उपचारासाठी आल्यानंतर त्यांची आवश्यक तपासणी न करता काही डॉक्टर ताप, सर्दी, खोकला आजारावर उपचार करीत असल्याने त्या रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी खालावत जाते. पुढे त्या रुग्णाला
श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे रुग्णांच्या मृत्यू होण्याच्या घटना अलीकडच्या काळात वाढू लागल्या आहेत. ही बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर चाचणी न करता उपचार करणाऱ्या खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना अशा
मृत्यूस जबाबदार धरले जाणार
आहे. दरम्यान, इतर आजारांमुळे जिल्ह्यात किती रुग्णांचा मृत्यू झाला त्याची निश्चित आकडेवारी मिळू शकली नाही.
प्राणवायू पातळी खालावल्यास रुग्णालयात दाखल व्हावे
ताप, सर्दी, खोकला व इतर करोनाची लक्षणे असलेले रुग्ण खाजगी डॉक्टरकडे आल्यास त्यांना आरोग्य केंद्रांमधून अँटिजन टेस्ट करण्यास सांगावे. या चाचणीचे नकारात्मक निकाल आल्यास त्यांना आरटीपीसीआर चाचणी करण्याच्या सूचना देण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. चाचणी अहवालात आजाराचा संसर्ग झाल्याचे निदान झाल्यास जवळच्या कोरोना काळजी केंद्रामध्ये दाखल करण्याची वैद्यकीय व्यावसायिकांनी रुग्णाला सूचना द्यावी, तसेच गृह विलगीकरणात राहत असणाऱ्या रुग्णांनी आपल्या शरीरातील प्राणवायूची पातळी नियमित तपासावी. प्राणवायू पातळी खालावल्यास त्यांनी रुग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.