‘पालघर जिल्हा गुजरातला जोडण्यासाठी वेगळं षडयंत्र’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 01:36 AM2018-05-03T01:36:07+5:302018-05-03T01:36:07+5:30
मुंबई व पालघर जिल्हा गुजरात राज्याला जोडण्यासाठी वेगळ षडयंत्र रचले जात आहे
पंकज राऊत
बोईसर : मुंबई व पालघर जिल्हा गुजरात राज्याला जोडण्यासाठी वेगळ षडयंत्र रचले जात आहे अशी भीती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोईसर येथे व्यक्त करून वेळीच जागे व्हा असे, आवाहन केले. तसेच जिंदालच्या नियोजित नांदगांव आलेवाडी बदराच्या विरोधात भूमिपुत्रा सोबत खंबीरपणे राहीन असे आश्वासन नांदगाव येथे जाऊन दिले.
आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेस चालना देण्यासाठी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मंगळवार (दि १ मे) पासून त्यांनी राज्य व्यापी दौरा वसईपासून सुरू केला त्याचा आज दुसरा दिवस होता. वसई येथील प्रचंड जनसमुदायांच्या उपस्थितीत दौऱ्यावरील पहिल्या व शेवटच्या जाहीर सभेनंतर राज ठाकरे यांनी तारापूर एमआयडीसी मधील हॉटेल रियांश ग्रँट येथे वास्तव्य केले.
बुधवारी सकाळी ८:३० पासून सिटीझन फोरम आॅफ बोईसर -तारापूर या सामाजिक संघटना, मुंबई-वडोदरा एक्सप्रेस विरोधी संघर्ष समिती, सूर्यापाणी बचाव समिती, जेष्ठ नागरिक बंधू भगिनी मंडळ, प्रेरित फाउंडेशन बोईसर यांच्या पदाधिकाºयांशी बैठक घेऊन चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पालघर पोट निवडणुकीत भाजपाविरोधी भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट केले.
जिंदाल (जेएसडब्ल्यू) नांदगाव - आलेवाडी बंदर विरोधी संघर्ष समितीचे सदस्य, नवापुर, मुरबे, आलेवाडीचे सरपंच, भूमिपुत्र, मच्छीमार, शेतकरी यांचे कडून बंदर उभारणीनंतर उद्भवणाºया समस्या व उध्वस्त होणारे संसार आणि जीवन या संदर्भात खरी वस्तुस्थिति जेथे नियोजित बंदराची जागा आहे त्या भागात राज ठाकरे यांनी प्रत्यक्ष जाऊन समजून घेऊन प्रस्थावित बंदराला स्थानिकांच्या मनातील खदखदणारा असंतोष व प्रचंड विरोधाची भूमिका पाहून जिंदाल व्यवस्थापन लोकांना फसवत असेल तर तुमचा लढा चालू असुद्या मी तुमच्या सोबत खंबीरपणे राहीन असे सांगितले. त्या वेळी त्यांच्या सोबत नितिन सरदेसाई, बाळा नांदगांवकर, अमित ठाकरे, कुंदन संखे, समीर मोरे, धीरज गावड आदी नेते उपस्थित होते.
बुलेट ट्रेन, मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्ग, कारिडॉर हे विनाशकारी प्रकल्प उभारून पालघर जिल्हा प्रथम गुजरातशी जोडून नंतर गिळकृत करण्याचा कुटील डाव असल्याचे सांगून मुंबईवर गुजरातशी संलग्न करण्यासाठी तसेच मुंबईवर ताबा मिळविण्यासाठी प्रथम पालघर जिल्ह्याला गुजरातशी जोडले जाईल हे त्यांनी ठासून सांगितले.
तारापूर औद्योगिक पट्ट्यात स्थानिकांना न मिळणारा रोजगार, नांदगाव व वाढवण बंदराला स्थानिकांचा व मच्छीमारांचा असलेला प्रखर विरोध, डहाणू-वैतरणा रेल्वे प्रवाशांच्या समस्या, ओएनजीसी सर्वेक्षणाचा मच्छीमारांना बसणारा फटका आदी विषयांवर त्यांनी आपले म्हणने मांडले.
पालघर जिल्हा सिडको नवनगर मधील गैरप्रकार, जिल्हाधिकारी यांचा मनमानी कारभार, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासीचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर, शौचालय व दुर्गम भागातील वीज पुरवठा व समस्या, जिल्ह्यातील आरोग्य सेवेची झालेली धूळधाण आदी विषयावर चर्चा केली. तसेच मनसे कार्यकर्त्यांशी भेट घेऊन त्यांच्या अडी-अडचणी तसेच पक्षसंघटना बांधणीच्या दृष्टीने त्यांनी चर्चा केली.