वसईच्या तहसिलदारांविरोधात असंतोष
By admin | Published: February 15, 2017 11:25 PM2017-02-15T23:25:12+5:302017-02-15T23:25:12+5:30
येथील तहसीलदार नियमानुसार आपल्या जबाबदाऱ्या पार पाडीत नसल्याची तक्रार वकीलांनी केली असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
वसई : येथील तहसीलदार नियमानुसार आपल्या जबाबदाऱ्या पार पाडीत नसल्याची तक्रार वकीलांनी केली असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
वसईच्या तहसिल कार्यालयात तोतया कर्मचाऱ्यांचा प्रादुर्भाव वाढला असून, त्यांच्याकडून सर्वसामान्यांंची मोठ्या प्रमाणात फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यालयातील प्रत्येक कर्मचाऱ्यांना आपले ओळखपत्र गळ्यात बाळगण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी अॅड. किशोर म्हात्रे यांनी तहसिलदार गजेंद्र पाटोळे यांच्याकडे केली होती. मात्र, या गंभीर बाबीची दखल त्यांनी घेतली नाही. त्यामुळे म्हात्रे यांनी जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांच्याकडे ही मागणी केली. त्यांनी तात्काळ तसे आदेश तहसिलदारांना दिले.
या आदेशाला एक वर्ष उलटून गेले आहे. तरीही हा आदेश पाळण्यात आलेला नाही. माहितीच्या अधिकाराखाली अॅड. म्हात्रे यांनी मागवलेल्या माहितीत ही माहिती उजेडात आली आहे. पाटोळे जर वरिष्ठांचे आदेश मानत नसतील तर सर्व सामान्यांना कोणता न्याय देत असतील असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
पाटोळे यांच्या या मनमानी कारभारामुळे नागरिकांना न्याय मिळणे तर दूरच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचाही अवमान होत असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)