डहाणूत तुलसीविवाहाची लगीनघाई ; सोहळ्यात सेल्फीचा डिमांड, भटजींचाही मान मोठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 03:25 AM2017-11-04T03:25:14+5:302017-11-04T03:25:26+5:30
कार्तिक शुद्ध एकादशीपासून तुलसी विवाहाला प्रारंभ झाला असून पौर्णिमेपर्यंत विवाहाचा सोहळा रंगणार आहे. दरम्यान या निमित्ताने हळदीकुंकवाचे कार्यक्रम पार पडत असल्याने महिलावर्ग पारंपरिक पद्धतीने सोहळ्याचा आनंद द्विगुणित करीत आहेत.
बोर्डी : कार्तिक शुद्ध एकादशीपासून तुलसी विवाहाला प्रारंभ झाला असून पौर्णिमेपर्यंत विवाहाचा सोहळा रंगणार आहे. दरम्यान या निमित्ताने हळदीकुंकवाचे कार्यक्रम पार पडत असल्याने महिलावर्ग पारंपरिक पद्धतीने सोहळ्याचा आनंद द्विगुणित करीत आहेत. गतवर्षी नुकताच जाहीर झालेल्या नोटबंदीच्या निर्णयाने तुलसी विवाह कार्यक्र मावर निरु त्साहाचे वातावरण होते.
कार्तिक शुद्ध एकादशी ते पौर्णिमा या कालावधीत समाजरीतीनुसार तुलसी विवाह लावण्याची पद्धत वेगवेगळी आहे. ग्रामीण भागात तिन्ही सांजेनंतर तुलसी विवाह लावला जातो. त्यामुळे या वेळी पंत्या आणि आकाशकंदिलाच्या रोषणाईने परिसर प्रकाशित झालेला दिसतो. तुलसी वृंदावना भोवती गेरू किंवा शेणाचा सडा घोलून रांगोळी काढली जाते. ऊसाच्या कांड्यांच्या मंडपाला फुलांच्या माळांनी सजविण्यात येते. बहुतेक ठिकाणी सुवाशींनीकडून विवाह लावण्याची प्रथा आहे. या करीता तुळशीला फुलं वा मोत्यांच्या मुंडावळ्या घालून ओटी भरली जाते. बाळकृष्णाची मूर्ती किंवा कृष्ण म्हणून उसाचे कांडे प्रतिकात्मक उभे ठेऊन आंतरपाट धरला जातो. पूर्वी तोंडाने तर हल्ली इंटरनेटवरून डाऊनलोड केलेली मंगलाष्टके मोबाईलद्वारे या वेळी वाजविली जात आहेत. या वेळी कार्यक्र मानंतर शिरा, फराळ तसेच आवळा, शिंगाडा, नारळ आदि. फळांचा प्रसाद वाटला जातो.
दरम्यान या विवाह सोहळ्यानिमित्त महिलांप्रमाणेच बच्चेकंपनी सेल्फी आणि ग्रुप फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करीत असल्याने सद्या तुलसी विवाहाची चर्चा रंगताना दिसत आहे. गतवर्षी तुलसी विवाह काळात नोटाबंदीच्या निर्णयाचे गालबोट सोहळ्याला लागल्याने उत्साहाचा आनंद लुटता आला नव्हता. पैशांची चणचण आणि व्यवहारातून बाद झालेल्या नोटा बदलण्यासाठी दिवसभर उभे राहणे या सर्व गोष्टीचा परिणाम तुलसी विवाह या सणावर झाल्याच्या कटू आठवणी लोकमतकडे बोलून दाखवल्या.