तारापूरच्या उद्याेगांना सांडपाणी साेडण्यास दहा दिवस मनाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 03:02 AM2020-12-10T03:02:56+5:302020-12-10T03:04:24+5:30
Tarapur News : तारापूर एमआयडीसीतील जुना २५ एमएलडी क्षमतेच्या सामुदायिक सांडपाणीप्रक्रिया केंद्राच्या (सीईटीपी) दुरुस्ती व मोठ्या प्रमाणात साठलेला स्लज काढण्याचे काम हाती घेतले आहे.
बोईसर - तारापूर एमआयडीसीतील जुना २५ एमएलडी क्षमतेच्या सामुदायिक सांडपाणीप्रक्रिया केंद्राच्या (सीईटीपी) दुरुस्ती व मोठ्या प्रमाणात साठलेला स्लज काढण्याचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी तेथे उद्योगातून सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी साेडण्यात येऊ नये म्हणून सोमवारपासून सीईटीपीच्या ग्रॅव्हिटी लाइनला जोडलेले सुमारे २५० उद्योगांमधील सांडपाणी पुढील दहा दिवस सीईटीपीमध्ये सोडू नये, असे निर्देश तारापूर एन्व्हायर्नमेंट प्रोटेक्शन सोसायटी (टीईपीएस) ने या उद्योगांना दिले आहेत. यामुळे या कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
टीईपीएसने उद्योजक व त्यांच्या प्रतिनिधींची ३ डिसेंबरला बैठक झाली. सांडपाणी बंद करण्यासंदर्भात घेतलेला निर्णय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संयुक्त संचालक डॉ. सोनटक्के यांच्या निर्देशांनुसार टीईपीएसने नाेटीस काढून सांडपाणी न सोडण्यासंदर्भात आदेश काढले आहेत. यामध्ये झोन ३ - एल, एम आणि एन तसेच झाेन ४च्या के, टी आणि डब्ल्यूपीटी आणि प्लॉट नं. ई ५३ पासून ई १२३ पर्यंत उद्योगांचा समावेश आहे. यादरम्यान कुणी सांडपाणी सोडताना आढळल्यास त्या उद्योगाला टीईपीएस-सीईटीपीकडून रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.
तारापूरमधील २५ एमएलडी क्षमतेच्या ‘सीईटीपी’मध्ये साचलेला स्लज तो पूर्ण काढून स्वच्छ केल्यानंतर सीईटीपीमधील सांडपाणी प्रक्रिया करण्याची क्षमता वाढून तो प्रकल्प व्यवस्थित चालणार आहे. मात्र, राष्ट्रीय हरित लवाद (एनजीटी)च्या कमिटीच्या निर्देशानुसार तारापूरच्या उद्योगांमधील प्रदूषणासंदर्भात तपासणीसाठी विशेष सर्वेक्षण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने सुरू केले आहे. या सर्वेक्षणाच्या कामावरही सीईटीपीच्या दुरुस्तीच्या कामाचा परिणाम हाेणार आहे.
जुना २५ एमएलडी क्षमतेच्या सीईटीपीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ते लवकर होण्यासाठी हा निर्णय ‘टीईपीएस’ने घेतला असून त्याचे काम प्रगतिपथावर आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पथक स्वतःहून सहभाग घेऊन रात्रंदिवस पाहणी करत आहेत.
- डॉ. राजेंद्र राजपूत, प्रादेशिक अधिकारी,
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, ठाणे विभाग