पालीच्या सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर
By Admin | Published: June 30, 2017 02:37 AM2017-06-30T02:37:46+5:302017-06-30T02:37:46+5:30
नायगाव पाली ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी पदाचा गैरवापर करून अनधिकृत बांधकामाला ना हरकत परवाना दिल्याचे उघडकीस
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : नायगाव पाली ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी पदाचा गैरवापर करून अनधिकृत बांधकामाला ना हरकत परवाना दिल्याचे उघडकीस आल्यानंतर सदस्यांनी मासिक सभा बोलावून सरपंचाविरोधात एकमताने अविश्वास ठराव संमत केला.
पाली ग्रामपंचायतीच्या सरपंच बालबीना स्टीफन डिसिल्वा यांनी हेमंत म्हसणेकर या बिल्डरला इमारत बांधण्यासाठी परस्पर ना हरकत दाखला दिला होता. या दाखल्याच्या आधारे बिल्डरने अनधिकृत इमारत बांधण्यास सुरुवात केली. याप्रकरणी ग्रामपंचायतीने नोटीस बजावून बांधकाम थांबवण्याचे आदेश बिल्डरला दिले होते. त्यानंतरही बिल्डरने बांधकाम सुरु ठेवल्याने २६ मे च्या ग्रामसभेत मोठा वाद झाला. याप्रकरणी उपसरपंच विजय राजेश बार यांनी प्रश्न उपस्थित केला असता ग्रामसेवकाने बिल्डरला ग्रामपंचायतीने ना हरकत दाखला दिलेला नसून बांधकाम थांबवण्याची नोटीस बजावली असल्याचे सांगितले. त्यावर उपसरपंच बार यांनी सरपंच बालवीना डिसिल्वा यांनी बिल्डर म्हसणेकर यांना ना हरकत दाखला दिल्याची प्रत ग्रामसभेत दाखवली होती. त्यावेळी सरपंचांनी पदाचा गैरवापर करून परस्पर ना हरकत दाखला दिल्याची बाब उजेडात आली होती. ग्रामसभेनंतर पाली ग्रामपंचायतीची मासिक सभा पार पडली. सरपंचांनी पदाचा गैरवापर करून बिल्डरला दाखला दिल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव उपसरपंच बार आणि सदस्या आर्सेला परेरा यांनी मांडला. हा प्रस्ताव बहुमताने संमत करण्यात आला आहे. पदाचा गैरवापर करणाऱ्या सरपंचांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी यासाठी हा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आला आहे. तर हेमंत म्हसणेकर यांनी सुरु केलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात यावी असा ठरावही बहुमताने संमत करण्यात आला.