वाड्यात नव्या नियुक्त्यांमुळे शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 12:17 AM2020-10-05T00:17:00+5:302020-10-05T00:17:12+5:30
उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुखांना हटवा : शिवसैनिकांची मागणी
वाडा : वाडा तालुक्यातील शिवसेनेत नुकत्याच कुडूस विभागातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. या नियुक्त्यांना जुन्या शिवसैनिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील व तालुकाप्रमुख उमेश पटारे यांनी आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांना पदे दिल्याचा आरोप करत त्यांना पदावरून हटवण्याची मागणी कुडूस परिसरातील जुन्या शिवसैनिकांनी सोशल मीडियावर केली आहे. यामुळे वाडा शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आला आहे.
नियुक्त्या करताना निष्ठावंत व जुन्या शिवसैनिकांना डावलून आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांना पदे देण्यात आली असून जुन्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्यात आल्याचा आरोप भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख धनंजय पष्टे यांनी केला आहे.
मनमानी कारभार करणाºया उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील व तालुकाप्रमुख उमेश पटारे यांना पदावरून हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे. लवकरच पालघर जिल्हा शिवसेनेचे संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांची आपण यासंदर्भात भेट घेणार असल्याचे धनंजय पष्टे यांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीला सांगितले.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख आणि तालुकाप्रमुखांविरोधात कुडूसमधील माजी कुडूस विभाग संपर्कप्रमुख जर्नादन भेरे, सुधीर पाटील, नरेंद्र जाधव, मिलिंद चौधरी, पंढरीनाथ पाटील, वैभव ठाकरे, राजेंद्र शेटे, किशोर पाटील आदी जुन्या शिवसैनिकांनी दंड थोपटले असून त्यांना हटवण्याची मागणी केली आहे.
जिल्हाप्रमुखांना विचारात घेऊन जुन्या पदाधिकाऱ्यांची पदे कायम ठेवून पक्षवाढीचे काम करणाºयांना संधी देण्यात आली आहे. यात कोणावरही अन्याय करण्यात आलेला नाही.
- सुनील पाटील, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना पालघर