जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आरोग्यसेवेचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 12:40 AM2020-11-25T00:40:26+5:302020-11-25T00:40:40+5:30
प्रा. आ. केंद्र महिला कर्मचाऱ्यांच्या भरवशावर
तलासरी : तलासरी तसेच डहाणू भागातील आरोग्यसेवेचा बट्ट्याबोळ उडाला असून रात्रीची सेवा सोडा, दिवसाही आदिवासी जनतेला सेवा मिळणे मुश्कील झाले आहे. ग्रामीण भागात आरोग्यसेवेचा बोजवारा उडाल्याने नाइलाजास्तव आदिवासी बांधवांना खाजगी रुग्णालयात महागडे उपचार घ्यावे लागत आहेत.
तलासरी तसेच डहाणू भागातील आरोग्य केंद्रे तसेच उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने रुग्णांना खाजगी वाहनाने वापी, सिल्व्हासा येथे उपचारासाठी जावे लागते. डहाणू तालुक्यातील सायवन प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळी वैद्यकीय अधिकारी हजर राहत नसल्याबाबत येथील रहिवासी विष्णू बोरसा यांनी पालघर जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापती काशिनाथ चौधरी यांच्याकडे तक्रार केली आहे.
या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी सभापती काशिनाथ चौधरी तसेच डहाणूच्या सभापती स्नेहलता चौधरी यांनी रात्री १० वाजता प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली असता रात्री वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याचे आढळून आले. केंद्रात फक्त दोन महिला कर्मचारी होत्या. इतर कर्मचारीही उपस्थित नसल्याने संतापलेल्या काशिनाथ चौधरी यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना पालघर जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिल्या आहेत.