विरार-सीएसटी लोकलला पश्चिम रेल्वेचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 03:18 AM2017-08-13T03:18:00+5:302017-08-13T03:18:09+5:30
लाखो प्रवाशांच्या सोयीसाठी विरार ते सीएसटी दरम्यान लोकल सुरु करण्यासा पश्चिम रेल्वेने नकार दिला आहे. त्यामुळे विरारहून सीएसटीपर्यंत थेट पोहोचण्याचे चाकरमान्यांचे स्वप्न सध्यातरी साकार होणे अवघड होऊन बसले आहे.
वसई : लाखो प्रवाशांच्या सोयीसाठी विरार ते सीएसटी दरम्यान लोकल सुरु करण्यासा पश्चिम रेल्वेने नकार दिला आहे. त्यामुळे विरारहून सीएसटीपर्यंत थेट पोहोचण्याचे चाकरमान्यांचे स्वप्न सध्यातरी साकार होणे अवघड होऊन बसले आहे.
डहाणूपासून विरार ते बोरीवली पर्यंतच्या लाखो प्रवाशांना सीएसटीला जाण्यासाठी दादरला उतरून लोकल पकडावी लागते. तर संध्याकाळी गर्दीच्या वेळी सीएसटीहून विरारकडे येणाºया प्रवाशांना प्रचंड त्रासाचा सामना करून चर्चगेट किंवा दादरला येऊन लोकल पकडावी लागते. यावेळी प्रचंड गर्दी असल्याने प्रवाशांना डब्यात चढणेही अवघड होऊन बसते. ही दगदग कमी व्हावी यासाठी विरारहून थेट सीएसटीपर्यंत लोकल सुरु करण्याची मागणी माजी नगरसेवक राजकुमार चोरघे यांनी रेल्वेकडे केली होती. सध्या सीएसटी लोकल सेवा अंधेरीपर्यंत सुरु आहे. ती विरारपर्यंत वाढवावी अशी चोरघे यांची मागणी होती. मध्य रेल्वे ज्याप्रमाणे हार्बर मार्गावर गाड्या चालवते. सीएसटी ते अंधेरी लोकल चालवते. त्याच धर्तीवर पश्चिम रेल्वेने विरार ते सीएसटी लोकल सेवा सुरु केल्यास त्यामुळे लाखो प्रवाशांना फायदा होईल, असे त्यांचे म्हणणे होते. पण, पश्चिम रेल्वेने विरार सीएसटी लोकल सेवा सुरु करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. हार्बर लाईनवर सर्व गाड्या मध्य रेल्वेकडून चालवल्या जातात. त्यामुळे हार्बर मार्गावर गाड्या चालवू शकत नाही, असे पश्चिम रेल्वे कळवले आहे.
प्रभूंना साकडे हाच पर्याय
वांद्रे आणि अंधेरी रेल्वे स्टेशन पश्चिम रेल्वेच्या कक्षेत येतात. त्यामुळे पश्चिम रेल्वेने विरारसह वांद्रे, अंधेरी हार्बर मार्गावर रेल्वे सेवा सुुरु करून ती सीएसटीपर्यंत न्यावी, अशीही त्यांची मागणी आहे.
त्यामुळे आता रेल्वेमंत्र्यांना साकडे घालण्याचा एकमेव उपाय या परीसरातील लाखो चाकरमान्यांपुढे उरला आहे.