‘महावितरण’विरोधात असंतोष; पालघर जिल्ह्यात वाढीव वीजदेयकांचा धसका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 12:07 AM2020-07-04T00:07:34+5:302020-07-04T00:07:45+5:30
नागरिकांकडून तक्रारींचा सूर सुरूच
वसई : पालघर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागांत टाळेबंदीनंतर महावितरणकडूनवीजदेयके दुप्पट पाठवण्यात आली असून अजूनही काही भागांत बिले पाठवण्यात येत आहेत. या वाढीव देयकांमुळे वीज ग्राहकांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. आधीच कोरोनाचे संकट आणि आर्थिक विवंचना असताना ही अवास्तव बिले भरायची कशी, असा सवाल ग्राहक करीत आहेत.
देशात तसेच राज्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे तीन महिने टाळेबंदी लागू करण्यात आली होती. या परिस्थितीत वीज कंपन्यांकडून मीटर रीडिंग न घेता सरासरी वापराप्रमाणे वीजदेयके पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, आता पाठवण्यात आलेली देयके ही सरासरी वापरापेक्षा दुप्पट-तिप्पट असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. अधिक रक्कम वसूल करून या वीज कंपन्या आपले आर्थिक नुकसान भरून काढत असल्याचा आरोप वीज ग्राहकांनी केला आहे.
ठाणे जिल्ह्यातील काही औद्योगिक भागात एका महिन्यापूर्वी बंद औद्योगिक वसाहतींना हजारो रुपयांची देयके पाठवण्यात आली असल्याचे प्रकरण समोर आले होते. ते प्रकरण चांगलेच तापल्यामुळे पुन्हा रीडिंग तपासूनच देयके पाठवण्याचा निर्णय वीज कंपनीकडून घेण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा रहिवासी, चाळी, बैठी घरे, गृह संकुलात राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या सरासरी वापरापेक्षा दुप्पट, तिप्पट किंवा त्यापेक्षा अधिक देयके पाठवण्यात आली असल्यामुळे याविषयी नागरिकांनी लेखी तक्र ारी केल्या आहेत. यावर वीज कंपनीकडून योग्य निर्णय न झाल्यास ही बिले न भरण्याचादेखील निर्णय नागरिकांडून घेण्यात आला आहे.
तीन महिन्यांचे जूनमध्ये देण्यात आलेले वीजबिल अतिशय अचूक आहे. योग्य स्लॅब व वीजदरानुसार तसेच प्रत्यक्ष वीजवापरानुसार आहे. एका पैशाचाही अतिरिक्त भुर्दंड या वीजबिलांमध्ये लावण्यात आलेला नाही. त्यामुळे वीज ग्राहकांनी कोणताही संभ्रम न ठेवता वीजबिल दुरुस्तीसाठी कार्यालयात गर्दी करू नये. तसेच जर वीज ग्राहक वीजबिलाची एकरकमी भरणा करू शकत नसतील, तर वीजबिल भरणा तीन समान मासिक हप्त्यांमध्ये (विलंब आकार व व्याजविरहित) भरू शकतील. जूनचे संपूर्ण बिल (थकबाकीसह) देय दिनांकापर्यंत भरल्यास जूनच्या चालू वीजदेयक रकमेच्या दोन टक्के परतावा जुलैच्या देयकामधून करण्यात येईल. - रूपेश पाटील, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, बोईसर (ग्रामीण) उपविभाग
बोईसर वीज कार्यालयात ग्राहकांची मोठी गर्दी
एप्रिल, मे व जून महिन्याच्या एकत्रित दिलेल्या वीज बिलाचे आकडे पाहून नागरिकांचे डोळे गरगरले असून बील कमी करून घेण्यासाठी शुक्रवारी महावितरणच्या बोईसर (ग्रामीण) उपविभागाच्या कार्यालयात ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली होती. या वेळी सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला होता. अखेर गर्दी आवरण्याकरिता पोलिसांना पाचारण करावे लागले.
लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे महावितरण कडून मीटर रीडिंग, वीज बिल वितरण व बिल भरणा केंद्रे बंद करण्यात आली होती. रीडिंग बंद झाल्यामुळे राज्यातील लघुदाब वीज ग्राहकांना सरासरी देण्यात आलेले वीज बिल हे अवाच्या सव्वा असून अन्यायकारक असल्याने ते त्वरित दुरुस्त व योग्य असे पुन्हा देण्यात यावे, अशी मागणी वीज ग्राहक करीत होते. लॉकडाऊनमध्ये ग्राहकांना हिवाळ्यातील वीज वापराप्रमाणे सरासरी देयके पाठविण्यात आली, मात्र उन्हाळ्यात लॉकडाऊनमध्ये वाढलेला प्रत्यक्ष वीजवापर व दि. १ एप्रिलपासून लागू झालेला नवीन वीज दर यामुळे एप्रिल, मे व जून महिन्याचे एकत्रित बिल दिले असल्याचे महावितरण कंपनीकडून सांगण्यात येत आहे.