विजेच्या वाढीव बिलांमुळे असंतोष; वसई-विरारचे ग्राहक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 03:45 AM2020-06-29T03:45:23+5:302020-06-29T03:45:33+5:30

वीजदेयके कमी करण्यासाठी ग्राहकांनी आता महावितरणच्या विविध विभागीय कार्यालयांत फेऱ्या मारण्यास सुरुवात केली आहे.

Dissatisfaction with increased electricity bills; Vasai-Virar customers harassed | विजेच्या वाढीव बिलांमुळे असंतोष; वसई-विरारचे ग्राहक हैराण

विजेच्या वाढीव बिलांमुळे असंतोष; वसई-विरारचे ग्राहक हैराण

Next

वसई : कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असताना आता महावितरणकडून ग्राहकांना मीटर रीडिंग न घेता दोन महिन्यांची सरासरी वीज देयके देण्यात आली आहेत. मात्र ही देयके वाढीव रकमेची असल्याने ती कमी करण्यासाठी व त्याबाबतच्या तक्रारीसाठी वसईत विविध वीज कार्यालयांत गेले दोन-तीन दिवस ग्राहकांची तोबा गर्दी व मोठ्या रांगा लागत आहेत. रविवारीही अनेक केंद्रांवर तक्रारींसाठी गर्दी झाली होती.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मागील दोन महिन्यांपासून महावितरणकडून घरोघरी जाऊन मीटर रीडिंग घेणे, वीज देयके पाठविणे आदी कामे बंद करण्यात आली होती. त्यामुळे वीज ग्राहकांना एप्रिल व मे या महिन्यांची वीज देयके पोहोचली नव्हती. मात्र आता टाळेबंदीत शिथिलता मिळाल्यानंतर ज्या भागात प्रतिबंधित क्षेत्र नाही, अशा भागातील वीज ग्राहकांना वीज देयके पाठविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र महावितरणकडून देण्यात येणारी वीज देयके ही अंदाजे आकारण्यात आल्याने ती वाढीव दिली असल्याच्या तक्रारी ग्राहकांनी महावितरणला केल्या आहेत. मागील तीन दिवस वसई तालुक्यातील सर्वच भागातील वीज कार्यालयांमध्ये तक्रार करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली असल्याचे चित्र सर्वत्र दिसते आहे. महावितरणने सरासरी बिल काढले असले तरी त्या बिलांमध्येही मोठी तफावत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा धोका
वीजदेयके कमी करण्यासाठी ग्राहकांनी आता महावितरणच्या विविध विभागीय कार्यालयांत फेऱ्या मारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. आधीच वसई-विरार शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्यातच बिल कमी करण्यासाठी ग्राहकांना रांगा लावाव्या लागत असल्याने प्रादुर्भाव होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

टाळेबंदी असल्याने कोणत्याही वीज ग्राहकाचे मीटर रीडिंग घेण्यात आले नाही. त्यामुळे ग्राहकांना सरासरी वीजदेयके देण्यात आली आहेत. जून महिन्यापासून मीटर रीडिंग घेण्यास सुरुवात केली आहे. पुढील जुलै महिन्यापासून ग्राहकांना मीटर रीडिंगच्या वापरानुसार देयके देण्यात येतील. - मंदार अत्रे, प्रभारी अधीक्षक अभियंता, महावितरण, वसई

Web Title: Dissatisfaction with increased electricity bills; Vasai-Virar customers harassed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.