पालघर सेनेत असंतोष; बंडखोरी शमवणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 12:06 AM2020-01-04T00:06:46+5:302020-01-04T00:06:55+5:30
एकनाथ शिंदेंच्या आजच्या दौऱ्याकडे लक्ष
- हितेन नाईक
पालघर : मोखाडा येथून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून शिवसेनेने तारापूर गटात आयात केलेल्या प्रकाश निकमसह अन्य काही उमेदवारांविरोधात सेनेमधून मोठी बंडखोरी उभी राहिली आहे. तर दुसरीकडे पालघर पंचायत समितीचे उपसभापती मेघन पाटील यांनी कंटाळून आपल्या उपसभापतीपद व पक्षातील पदाचा राजीनामा पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी सेनेचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे पालघर जिल्ह्यात येत असून जिल्हाप्रमुखांच्या निर्णयाविरोधात उभी राहिलेली बंडखोरी शमविण्यात त्यांना यश येते की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीत बाहेरच्या पक्षातील लोकांना उमेदवारी दिल्याचा फटका शिवसेनेला बसून नगराध्यक्षपदाला शिवसेनेला मुकावे लागले होते. तर विधानसभा निवडणुकीत बोईसर विधानसभेतही बाहेरच्या उमेदवाराला तिकीट दिल्याने काही नाराज स्थानिक शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांची नाराजी भोवत शिवसेनेच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला होता. अशाच काही घटनांमधून शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी बोध घेणे आवश्यक असताना सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काही चुकीच्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आल्याने शिवसैनिक संतप्त झाले असून अनेक बंडखोरांनी सेनेच्या उमेदवारांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज भरले आहेत. पक्षवाढीसाठी जीवापाड मेहनत घेऊन उमेदवारीची इच्छा प्रकट करायची तर चुकीच्या उमेदवारांना तिकिटे देऊन आमच्या भागात लादले जात असल्याने स्थानिक पदाधिकारी संतप्त झाले आहेत. असे अनेक प्रकार जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात झाल्याचे नाराज शिवसैनिकांचे म्हणणे आहे.
तारापूर गटात अनुसूचित जमातीचे आरक्षण पडल्यावर तेथील गटात अनेक वर्षांपासून निष्ठेने काम करणाºया पदाधिकाºयांच्या चर्चेतून एखादा स्थानिक उमेदवार देण्याची मागणी होत असताना मोखाड्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांना तारापूर गटातून उमेदवारी देण्यात आल्याने स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिक संतप्त झाले आहेत. तारापूर हा भाग सेनेला अनुरूप नसून मुस्लिमबहुल भाग मोठ्या प्रमाणात असल्याने तसेच कुडण गणातील माजी पं.स. सदस्य स्वत: वनई गटातून निवडणूक लढवीत असल्याने सेनेला त्याचा फटका बसू शकतो, अशी चर्चा आहे. दुसरीकडे अकरपट्टी, पोफरण सेनेला अनुकूल असली तरी देलवाडी, दहिसरमध्ये सेनेपेक्षा भाजप व इतर पक्ष सरस आहे, तर कुरगावमध्ये सेना-भाजप-राष्ट्रवादीमध्ये मते मिळविण्याची मोठी लढत होणार असल्याने ज्या परनाळीवर सेनेची भिस्त आहे, तेथील शिवसैनिक, पदाधिकारी नाराज असल्याने त्याचा मोठा फायदा दुसºया उमेदवाराला मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.
सरावली गणातून निवडून गेलेले व पंचायत समितीमध्ये उपसभापती म्हणून चांगले काम केलेले मेघन पाटील यांना डावलून दुसºया भागातून मुकेश पाटील यांची उमेदवारी लादण्यात आल्याने मेघन पाटील यांनी उपसभापती व पक्षाचा राजीनामा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांच्याकडे पाठवला असून चुकीचे निर्णय लादण्याचा जाब संबंधितांना विचारण्यात यावा, असे पत्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पाठविण्यात आले आहे. राज्यात शिवसेनेची सत्ता असताना पालघर जिल्हा परिषदेच्या ५७ जागांवर उमेदवार उभे करण्यास स्थानिक पदाधिकाºयांना अपयश आले असून फक्त ४६ जागा शिवसेनेकडून लढल्या जात आहेत. गट-गणातील निष्ठावान व मतदारांशी दांडगा संपर्क असलेल्या शिवसैनिकांना डावलून बाहेरच्या गटातील शिवसैनिकांना उमेदवारी देण्यात आल्याने सेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्र ारी करून उपसभापती मेघन पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हा प्रमुखपदावरून राजेश शहा यांची गच्छंती करावी, अशी मागणी जोर धरू लागली असून त्यांना कमी केल्यास सेनेच्या उमेदवारा-विरोधात उभे राहिलेले सर्व अपक्ष उमेदवार आपले अर्ज मागे घेऊन सेनेच्या उमेदवाराचा प्रचार करतील, असे आपले नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला काही शिवसैनिकांनी सांगितले. दरम्यान, शनिवारी दौºयावर येणारे एकनाथ शिंदे यावर काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
जिल्हाप्रमुख कारणीभूत - संतोष वझे : वनई (वाणगाव) गणातून सेनेत ३० वर्ष निष्ठेने काम करणाºया उपतालुका प्रमुख संतोष वझे यांनी मागितलेली उमेदवारी डावलून पास्थळच्या सुशील चुरी यांना उमेदवारी दिल्याने नाराज वझे यांनी सेनेला रामराम ठोकीत उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगितले. या सर्व बाबींना जिल्हाप्रमुख राजेश शहा कारणीभूत असल्याचे वझे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दरम्यान, या संदर्भात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश शहा यांच्याशी अनेक वेळा संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.
भाजप खासदार कपिल पाटील यांनी वाड्यात मांडले ठाण
वाडा : पालघर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाºया पंचायत समितीच्या निवडणुका ७ तारखेला होत असून या निवडणुकीत जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकवण्याचा निर्धार खा. कपिल पाटील यांनी केला आहे. यासाठी ते वाड्यात ठाण मांडून बसले आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची वाड्याची जबाबदारी पक्षाने त्यांच्यावर सोपवली आहे. यासाठी ते अनेक दिवसांपासून वाड्यात ठाण मांडून बसले आहेत. शुक्रवारी दुपारी कुडूस गट व त्याअंतर्गत येणारे चिंचघर व कुडूस या गणांचा त्यांनी आढावा घेतला.
त्यानंतर सायंकाळी त्यांनी पालसई गटात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधून एकदिलाने काम करून भाजपचे निर्विवाद वर्चस्व असलेले गट-गण कायम राखण्याचे आवाहन केले. मांडा गटातही जाऊन त्यांनी परिस्थिती जाणून घेतली. या वेळी भाजपचे तालुका अध्यक्ष संदीप पवार, ज्येष्ठ कार्यकर्ते योगेश पाटील, कुंदन पाटील, मनीष देहेरकर, कृष्णा भोईर, केशव पाटील, राजेश चातुर्य आदी पदाधिकाºयांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.