कुंद वातावरणामुळे रोगाचे सावट
By admin | Published: November 26, 2015 01:25 AM2015-11-26T01:25:51+5:302015-11-26T01:25:51+5:30
आठवडाभर तालुक्यात ढगाळ वातावरण तयार झाले असून अधूनमधून पाऊस पडत असल्याने भाजीपाला, कडधान्ये व फळिपकांवर रोगाचे सावट असून शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
वाडा : आठवडाभर तालुक्यात ढगाळ वातावरण तयार झाले असून अधूनमधून पाऊस पडत असल्याने भाजीपाला, कडधान्ये व फळिपकांवर रोगाचे सावट असून शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
वाडा तालुक्यातील शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. सिंचनाच्या सुविधा नसल्याने शेतात विहीर किंवा कुपनलिका मारून शेतकरी भाजीपाला, कडधान्ये तसेच फळपिकांचे उत्पादन घेत असतात. मात्र गेल्या आठवडाभर ढगाळ वातावरण तसेच अधूनमधून रिमझिम पाऊस पडत असल्याने शेतीचे नुकसान होत आहे. भाजीपाला, कडधान्ये, फळपीक यांच्यावर रोग पडला असून औषध फवारणी करूनही रोगाचे उच्चाटन होत नाही. घोणसई येथील शेतकरी सुरेश पाटील, नितीन चौधरी यांनी एक एकर जागेत गवार भाजीपाला पिकाची तसेच काकडीची लागवड केली आहे मात्र, सध्याच्या वातावरणामुळे रोगाचे सावट पसरले आहे. औषधे फवारणी करूनही रोगाचे उच्चाटन होत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
आंबा व काजू या फळांचा मोहरही ढगाळ वातावरणामुळे हातून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. तर वाडा तालुक्यातील भाजीपाला, कडधान्ये, व फळपिकांचे मोठे नुकसान झाले असून त्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे वाडा तालुकाध्यक्ष पांडुरंग पठारे यांनी तहसीलदारांकडे केली आहे.