जव्हारच्या शिवाजी गार्डनची दूरवस्था, बच्चेकंपनी नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 02:07 AM2018-02-23T02:07:01+5:302018-02-23T02:07:01+5:30
जव्हार नगरपरिषदेतील शिवाजी उद्यानाची दुरावस्था झाली असून, हे उद्याने नावापुरतेच राहीले आहे. हे शहरातील सर्वात मोठे व एकमेव उद्यान आहे.
हुसेन मेमन
जव्हार : जव्हार नगरपरिषदेतील शिवाजी उद्यानाची दुरावस्था झाली असून, हे उद्याने नावापुरतेच राहीले आहे. हे शहरातील सर्वात मोठे व एकमेव उद्यान आहे. त्याचीच दुरवस्था झाल्याने बालचमूंची पंचाईत झाली आहे. लहान मुलांनी विरंगुळा शोधायचा कुठे? असा प्रश्न पालकांना पडला आहे. त्यामुळे नगरपरिषदेने येथे गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
जव्हार नगरपरिषद हद्दीतील शिवाजी उद्यानातील घसगुंडी, पाळणे, झोपाळे, झोके अशी खेळणी मोडकळीस आली आहेत. उद्यानात मुलांना खेळण्यासाठी एकही खेळणं व्यवस्थित राहिलेले नसून, उद्यानाची व त्यातील खेळण्यांची अवस्था भंगार झाली आहे. त्यामुळे लहान मुलांना सायंकाळी न्यावे तरी कुठे असा प्रश्न पालकांना पडला आहे.
शिवाजी उद्यानाची संरक्षक कुंपण मोडले असून, उद्यानाची समोरील भिंत रोड रस्त्याच्या मार्जिनमध्ये येत असून तीही कोसळली आहे. तसेच गुरे, ढोरे, कुत्रे, डुकरांचा वावर असून, झाडी झुडपांची मोठी नासधूस झाली आहे. तसेच दिवे, बसण्याची व्यवस्था तसेच चालण्यासाठी निर्माण केलेले रस्ते या सगळ्याच बाबींची बोंब झालेली आहे.
जर नगरपालिकेला हे उद्यान नीट ठेवता येत नसेल तर ते एखाद्या धनिकाला अथवा संस्थेला दत्तक देऊन त्याचे सुशोभिकरण करावे असा प्रस्तावही नागरीक नगरपालिकेला सुचवित आहेत.