नवीन ९५४ शिधापत्रिकांचे वितरण
By admin | Published: February 19, 2017 03:58 AM2017-02-19T03:58:06+5:302017-02-19T03:58:06+5:30
या तालुक्यातील पुरवठा खात्याने जानेवारी महिन्यात ९५४ नवीन शिधापत्रिकांचे वितरण केले. त्यात ४८६ केसरी तर ४६८ पिवळ्या शिधापत्रिकांचा समावेश होता.
- राहुल वाडेकर, विक्रमगड
या तालुक्यातील पुरवठा खात्याने जानेवारी महिन्यात ९५४ नवीन शिधापत्रिकांचे वितरण केले. त्यात ४८६ केसरी तर ४६८ पिवळ्या शिधापत्रिकांचा समावेश होता. ही माहिती प्रभारी पुरवठा अव्वल कारकुन पुुंडलिक पाटील यांनी दिली. तालुक्यातील ९५ गाव-पाडयांतील अनेक ग्रामस्थ फाटलेल्या, जीर्ण झालेल्या, हरविलेल्या, दुय्यम शिधापत्रिका तसेच नवीन व विभक्त शिधापत्रिका मिळविण्यासाठी अर्ज करीत असतात. त्यांचा तत्परतेने निपटारा केल्याने हे वितरण शक्य झाले. गेल्या वर्र्षीच्या तुलनेत यावर्षी नवीन शिधापत्रिका घेणा-यांची आकडेवारी जास्त आहे.
विक्रमगड तालुक्यात ९२ धान्यदुकानदार व ९६ किरकोळ केरोसिन परवानाधारक आहेत़ त्यामध्ये बीपीएल, अंत्योदय, एपीएल, अन्नपूर्णा, पांढरे अशा कार्डधारकांचा समावेश आहे. एकूण २७,९८३ धारक शिधापत्रिकांचा वापर करीत आहेत. मात्र तालुक्याचा मोठया स्वरुपाचा विस्तार असतांना विक्रमगडच्या पुरवठाविभागाकडे शासनाचे दुर्लक्ष आहे़ कारण या कार्यालयात तालुका निर्मितीपासून अस्थापनाच मंजूर नाही. ़त्यामुळे अपवाद वगळता पुरवठा निरिक्षक,पुरवठा अव्वल कारकून व इतर महत्वाची पदे रिक्त असून प्रभारीपदांवर कर्मचारी व अधिका-यांची नियुक्ती करण्यांत आल्याने कामाचा ताण वाढत असून याचा परिणाम ग्राहकांना सुविधा पुरवितांना दिसतो़ त्यामुळे नवीन रेशनकार्ड नागरिकांना महिनो-महिने प्रतिक्षा करूनही मिळकत नाही. येथील नागरिकांना जुनेच रेशनकार्ड संपले तरी तेच वापरावे लागत होते.
नियमाप्रमाणे दर पाच वर्षांनी नवीन शिधापत्रिका द्यावी असा नियम आहे़ परंतु अनेकदा ती लवकर संपते त्यावर नोंदी करणे शक्य होत नाही. अशा स्थितीतही येथील प्रभारी पुरवठा अव्वल कारकून पुंडलिक पाटील तसेच तहसिलदार सुरेश सोनवणे व इतर कर्मचारी वर्ग आलेल्या धारकांना होईल तेवढे सहकार्य करुन त्यांची कामे करुन देत आहेत. असे असले तरी शासनाने पुरवठा विभागातील सर्व रिक्त पदे भरणे खूप गरजेचे आहे.
तसेच शासनाने दारिद्रयरेषेचा सर्व्हे व त्याच्या यादीला मंजूरी न दिल्याने दारिद्रयरेषेखाली असूनही ग्राहकांना पिवळे रेशनकार्ड न मिळता केसरी रेशनकार्ड घ्यावे लागत आहेत़ कारण अंत्योदय शिधापत्रिकांचा शासनाने दिलेला कोटा अपुरा असल्याने जे लाभार्थी त्याला पात्र आहेत. असे अनेक या शिधापत्रिकांपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे हा कोटा वाढवून द्यावा अशीही जनतेची मागणी आहे.
नविन रेशनकार्ड देतांना अर्जदाराने सादर केलेली सर्व कागदपत्रे तपासावी लागतात़ तसेच त्याबाबतचा पंचनामा घरी जाऊन करावा लागतो त्यानंतरच शिधापत्रिका देता येते. अगोदरच कर्मचारी कमी त्यामध्ये या बाबी पाहणे गरजचे असल्याने कधीकधी शिधापत्रिका देण्यास वेळही लागतो तर दाद्रियरेषेखालील वाढीव लाभार्थ्यांच्या यादीला मंजुरी मिळेपर्यत संबंधिताला पिवळे कार्ड देता येत नाही़
-पुंडलिक पाटील,
अव्वल कारकून , प्रभारी पुरवठा