वैधता संपलेल्या सॅनिटायझरचे केले वाटप, ग्रामपंचायतीविरोधात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 11:51 PM2021-05-03T23:51:09+5:302021-05-03T23:51:54+5:30

न्ह्याळे ग्रामपंचायतीविरोधात तक्रार

Distribution of validated sanitizers | वैधता संपलेल्या सॅनिटायझरचे केले वाटप, ग्रामपंचायतीविरोधात तक्रार

वैधता संपलेल्या सॅनिटायझरचे केले वाटप, ग्रामपंचायतीविरोधात तक्रार

Next
ठळक मुद्देग्रामपंचायतीत १ मे रोजी ग्रामसेवक गणेश ऐकल यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी एक हजार सॅनिटायझरच्या बाटल्या वाटप केल्या.

जव्हार : ग्रामीण भागात कोरोना वाढत असून, दररोज शेकडो बाधित रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. मात्र न्ह्याळे खुर्द ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि पुरवठादार यांच्या संगनमताने माणुसकीचा कळस पार करीत थेट वैधता संपलेले ५०० मिलीचे एक हजार सॅनिटायझर गावात वाटप करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. तेथील स्थानिक व आदिवासी एकता परिषदेचे सदस्य मिलिंद बरफ यांनी हा सर्व प्रकार उघडकीस आणला असून, दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी लेखी तक्रार तहसीलदार संतोष शिंदे यांच्याकडे केली आहे.

ग्रामपंचायतीत १ मे रोजी ग्रामसेवक गणेश ऐकल यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी एक हजार सॅनिटायझरच्या बाटल्या वाटप केल्या. ग्रामीण भागातील अडाणीपणाचा फायदा घेत पुरवठादाराने एप्रिल २०२० मध्ये तयार केलेला, ज्याची वैधता मार्च २०२१ मध्ये समाप्त होते, अशा निकृष्ट दर्जाच्या मालाचा पुरवठा केला.
पुरवठादाराने आपल्या फायद्यासाठी वैधतेचे वर्ष चक्क मार्कर पेनने बदलून २१ ऐवजी २२ केले. ग्रामसेवकाने वैधता न तपासताच सॅनिटायझर वाटप करून दिले. तक्रारदार मिलिंद बरफ यांनी सोशल मीडियावर हा प्रकार उघडकीस आणला. त्यांनी मार्कर पेनने वाढवलेला आकडा त्याच सॅनिटायझरचा वापर करून पुसून दाखवला. त्यामुळे ग्रामसेवक आणि पुरवठादार यांचे धाबे दणाणले. ग्रामसेवकाने तातडीने दिलेले सर्व सॅनिटायझर जमा करून घेतले. कोरोनापासून बचावासाठी उपयुक्त असलेल्या सॅनिटायझरचा पुरवठा हा वैधता समाप्त असलेला केल्यामुळे स्थानिकांत तीव्र नाराजी पसरली आहे.

हे सॅनिटायझर जव्हार येथून  खरेदी केलेले आहेत. मला पैसे घेऊन प्रकरण दाबण्याचे आमिषसुद्धा दिले गेले, पण मी ते झुगारून टाकले असून, दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी तक्रार केली आहे.
- मिलिंद बरफ, ग्रामस्थ, न्ह्याळे खुर्द

याबाबत चौकशी करतो. हे प्रकरण गटविकास अधिकाऱ्यांच्या अखत्यारित येते. त्यांना पुढील सूचना दिल्या आहेत.
- संतोष शिंदे, तहसीलदार, जव्हार

Web Title: Distribution of validated sanitizers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.