जिल्हा सहकारी बँकेला नोटांची चणचण कायम
By admin | Published: June 10, 2017 01:02 AM2017-06-10T01:02:50+5:302017-06-10T01:02:50+5:30
केंद्र शासनाच्या नोटाबंदीनंतर ५०० व १००० रुपयांच्या नोटा बदलून न मिळाल्यामुळे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मोठ्या
निखिल मेस्त्री ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : केंद्र शासनाच्या नोटाबंदीनंतर ५०० व १००० रुपयांच्या नोटा बदलून न मिळाल्यामुळे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मोठ्या आर्थिक चणचणीचा सामना करावा लागत असून पालघर जिल्ह्यामध्ये बँकेवर अवलंबून असलेल्या सहकारी शेतकी संस्थांनी आपल्या सदस्य असलेल्या शेतकऱ्यांना खरीप कर्जमंजूर करूनही बँकेकडील पैशांच्या तुटवड्यामुळे ही खरीप कर्जे व त्यांच्या रकमा या शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे निदर्शनास आले असून त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.
पावसाळा सुरू होऊनही ठाणे जिल्हा बँकेला पालघर जिल्ह्यात ८५ कोटी लक्ष्य असलेल्या खरीप कर्जाच्या रकमेतून ३१ मे पर्यंत फक्त २६ कोटी १५ लाख रुपये एवढेच म्हणजे ३०.७७ टक्के कर्जवाटप झाले असल्याचे लोकमतकडे असलेल्या उपलब्ध माहितीनुसार कळते. गतवर्षी हेच कर्जवाटप ३० मे पर्यंत ३८ कोटी २२ लाख एवढे होते.
जिल्ह्यातील शेतकी सहकारी संस्था जिल्हा बँकेशी संलग्न आहेत. या संस्था आपल्या शेतकरी सभासदांना त्यात्या हंगामात कर्जपुरवठा करत असतात. त्यानुसार, या सभासदांना हे खरीप कर्ज मंजूरही झाले आहे. मात्र, बँकेकडे पैशांचा तुटवडा असल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या कर्जाची पूर्ण रक्कम आजवर उचलता आली नाही. त्यामुळे शेतीला आवश्यक बी-बियाणे, खते व शेतीपूरक सामग्री खरेदी करताना शेतकऱ्यांसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.