जिल्ह्यात आता दररोज हजार चाचण्या; प्रयोगशाळांचा पूर्ण क्षमतेने वापर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 02:12 AM2021-03-21T02:12:35+5:302021-03-21T02:12:54+5:30
जिल्हाधिकारी डॉ. गुरसळ यांचे आदेश, आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
पालघर : जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येला आळा घालण्यासाठी कोरोनाबाधितांच्या संपर्कातील नागरिकांच्या तपासणीसाठी कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगमध्ये वाढ करून आरटीपीसीआरद्वारे तत्काळ चाचण्या करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. आता दिवसाला एक हजार चाचण्या करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिली.
जिल्ह्यातील डहाणू येथील मॉडेल रुरल हेल्थ रिसर्च सेंटर या केंद्रात सद्य:स्थितीत १०० जणांच्या तपासण्या केल्या जात असून मुंबईच्या हाफकीन इन्स्टिट्यूटमध्ये २०० तर परळ केंद्रात १०० नमुने तपासले जात आहेत. पूर्वी मुंबईमध्ये तपासल्या जाणाऱ्या नमुन्यांची संख्या ५०० पेक्षा अधिक होती, मात्र राज्यातील अन्य भागांत रुग्णसंख्या वाढल्याने मुंबईमधील शासकीय यंत्रणेमध्ये जिल्ह्यातील फक्त ३०० ते ४०० नमुन्यांची तपासणी होत असल्याने चाचण्या घेऊनही त्यांचा अहवाल येण्यास उशीर होत असल्याने जिल्हा प्रशासनासमोरील अडचणींत वाढ होत होती. जिल्ह्यात सद्य:स्थितीत ८६४ कोरोनाबाधितांची संख्या झाली असून, शुक्रवारी ११० नवीन रुग्णांची भर पडली आहे.
८६७ नागरिकांच्या चाचण्यांचा अहवाल अजूनही प्रलंबित असल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केलेला तक्ता सांगत आहे. सध्या सर्दी, पडसे, ताप, खोकला आदी साथीचे आजार वाढले असून, कोरोनाच्या चाचण्यांवर भर देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यासाठी कोरोना चाचणीच्या प्रयोगशाळांचा पूर्ण क्षमतेने वापर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
दरम्यान, आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यातील कोरोना तपासणी क्षमता वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असून डहाणू येथील वेदांत रुग्णालयात दररोज सुमारे १५० नमुन्यांची तपासणी करण्यासाठी लागणारी रसायने व इतर साधनसामग्री पुरविण्यासाठी आरोग्य विभागाला कळविण्यात आले आहे.
आरटीपीसीआर चाचण्यांद्वारे बाधितांचा शोध
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी चालविलेल्या प्रयत्नांना यश आले असून आरटीपीसीआर चाचण्यांची क्षमता वाढत आता प्रत्येक दिवसाला एक हजार चाचण्यांचा अहवाल प्राप्त होणार आहे. ५०० चाचण्या हाफकीन इन्स्टिट्यूट तर अन्य ५०० चाचण्या राष्ट्रीय विषाणू संस्था, पुणे येथून केल्या जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यासाठी आरोग्य विभागाचे सचिव सौरव विजय, पद्मश्री डॉ. तात्यासाहेब लहाने, पालक सचिव डॉ. संजय चहांदे, जे. जे. रुग्णालयाच्या डॉ. अमिता आदींचे सहकार्य मिळाले आहे. त्यामुळे आता कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगमध्ये वाढ करून आरटीपीसीआर चाचण्यांद्वारे कोरोनाबाधितांचा तत्काळ शोध घेऊन विषाणू प्रादुर्भाव रोखता येणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला.