जि. प. नोकरीसाठी ओबीसी-एससी उमेदवारांच्या सर्वाधिक जागा राखीव
By admin | Published: January 23, 2016 02:44 AM2016-01-23T02:44:44+5:302016-01-23T02:44:44+5:30
जिल्ह्यातील इतार मागासवर्गीय (ओबीसी) व अनुसूचित जाती (एससी) उमेदवारांसाठी ठाणे जिल्हा परिषदेत होणाऱ्या सरळसेवा भरतीमध्ये सर्वाधिक जागा
सुरेश लोखंडे, ठाणे
जिल्ह्यातील इतार मागासवर्गीय (ओबीसी) व अनुसूचित जाती (एससी) उमेदवारांसाठी ठाणे जिल्हा परिषदेत होणाऱ्या सरळसेवा भरतीमध्ये सर्वाधिक जागा राखीव ठेवल्याचे १९ जानेवारीच्या राज्य शासन निर्णयाव्दारे उघड झाले आहे. यामुळे विविधांगांनी लाभदायक ठरलेले ठाणे जिल्हा विभाजन या दोन प्रवर्गांसाठी देखील सुखद धक्का देणारे ठरले आहे. तर खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी दोन्ही जि.प.च्या भरतीसाठी ४८ टक्के आरक्षण केले आहे.
विभाजन झाल्यानंतरही ठाणे व पालघर या दोन्ही जिल्हा परिषदेच्या सरळ सेवा भरतीची बिंदू नामावली आतापर्यंत एकच होती. यामुळे जिल्हा परिषदेतील रिक्त जागांची संख्या निश्चित करणे शक्य होत नव्हते. या समस्येवर कायमचा तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाने हा निर्णय लागू केला आहे. याद्वारे ठाणेसह पालघर जिल्हा परिषदेच्या सरळसेवा भरतीसाठी प्रवर्गनिहाय आरक्षण लागू केले आहे.
ठाणे जि.प.च्या भरतीत या आधी ओबीसी उमेदवारांसाठी केवळ नऊ टक्के आरक्षण होते ते आता १९ टक्के केले आहे. तर पालघर जि.प.त या प्रवर्गासाठी नऊ टक्के जागा राखीव ठेवल्या आहत. या प्रमाणेच एसी उमदेवारांसाठी ठाणे जि.प.मध्ये आधीच्या आठ टक्के ऐवजी १३ टक्के जागा सरळसेवा भरतीसाठी लागू केल्या आहेत.
तर पालघर जि.प.साठी ही संख्या आठ टक्के निश्चित केली आहे. यामुळे आधीच्या आरक्षरणाच्या तुलनेत ठाणे जि.प.मध्ये ओबीसींना १० टक्के तर एससी प्रवर्गास पाच टक्के जादा जागा राखीव पदाचा लाभ विभाजनामुळे मिळाला आहे. विभाजनानंतर मूळ ठाणे जिल्ह्यातून आदिवासी बहुल तालुके वगळण्यात आले. यामुळे ठाणे जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत आदिवासी लोकसंख्या (एसटी) ५.२६ टक्के आहे. यामुळे एसटी प्रवर्गासाठी या आधी ठाणे जि. प.च्या सरळसेवा भरतीचे आरक्षण २२ टक्केवरून सात टक्के केले आहे. तर पालघर जिल्ह्याची आदिवासी लोकसंख्या ३७.३९ टक्के असल्यामुळे या पालघर जि.प.च्या भरतीत एसटी उमेदवारांसाठी सर्वाधिक २२ टक्के पद भरतीचेआरक्षण लागू केले आहे.
या दोन्ही जिल्हा परिषदांच्या सरळसेवा भरतीचे उर्वरित प्रवर्गाच्या आरक्षणाची टक्केवारी दोन्हीकडे सारखीच निश्चित केली आहे. यामध्ये वि.जा.-अ तीन टक्के, भ.ज.-ब २.५ टक्के, भ.ज.-क ३.५ टक्के भ.ज.-ड दोन टक्के, विमाप्र.-दोन टक्के, अािण खुल्या प्रवर्गासाठी ४८ टक्के जागा या सरळसेवेच्या भरतीसाठी लागू केल्या आहेत.