बच्चू कडू यांच्या निर्देशा नंतर अखेर मीरा भाईंदर मध्ये दिव्यांग स्टॉलना परवाने मिळणार 

By धीरज परब | Published: February 12, 2024 12:46 AM2024-02-12T00:46:26+5:302024-02-12T00:46:26+5:30

मीरा भाईंदर महापालिकेत सत्ताधारी भाजपाच्या काळात प्रशासनाने दिव्यांग, गटई व दूध स्टॉलना परवाने देण्यास बंद केले होते.

Divyang stalls will finally get licenses in Mira Bhayander after Bachchu Kadu's directive | बच्चू कडू यांच्या निर्देशा नंतर अखेर मीरा भाईंदर मध्ये दिव्यांग स्टॉलना परवाने मिळणार 

बच्चू कडू यांच्या निर्देशा नंतर अखेर मीरा भाईंदर मध्ये दिव्यांग स्टॉलना परवाने मिळणार 


मीरारोड - गेल्या अनेक वर्षां पासून दिव्यांगांसह गटई व दूध केंद्र स्टॉलना परवाने देण्यास चालढकल करणाऱ्या मीरा भाईंदर महापालिकेला दिव्यांग मंत्रालयाच्या उपक्रमाचे अध्यक्ष मंत्री दर्जा असलेले आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या निर्देशा नंतर पालिकेने पहिल्या टप्प्यात दिव्यांगांना स्टॉल परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे. नंतर गटई व दूध केंद्र स्टॉलना परवाने दिले जाणार आहेत. 

मीरा भाईंदर महापालिकेत सत्ताधारी भाजपाच्या काळात प्रशासनाने दिव्यांग, गटई व दूध स्टॉलना परवाने देण्यास बंद केले होते. वास्तविक शासनाने पूर्वीच स्टॉल धोरण मंजूर केले असताना नव्याने धोरण करायचे सांगत चालढकल केली जात होती. तर पूर्वी दिलेल्या परवान्यांचे सुद्धा नूतनीकरण करण्यास टाळाटाळ चालली होती. या दरम्यान काही दिव्यांग, गटई कामगारांचे स्टॉल पालिकेने तोडले होते. 

न्यायालयाचे आदेश, शासन धोरण असून देखील दिव्यांग, गटई काम करणाऱ्यांना स्टॉल दिले जात नसल्या बद्दल पालिकेवर मोर्चे निघाले. आंदोलने झाली. अनेकवेळा मागण्या करण्यात आल्या. गेल्या काही काळापासून बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलने, मागण्या व बैठका पालिकेत झाल्या. दुसरीकडे शहरात सर्रास नव्याने बेकायदा स्टॉल उभारले जात असताना महापालिका मात्र बघ्याच्या भूमिकेत होती. काहींनी तर बोगस परवाने केल्याचे आरोप झाले. नंतर पालिकेने काही प्रमाणात कारवाई केली. मध्यंतरी पालिकेने शहरातील स्टॉलचे सर्वेक्षण केले असता २६८  परवानगी दिलेले स्टॉल व्यतिरिक्त सुमारे २०० च्या आसपास अनधिकृत स्टॉल आढळून आले. 

एकीकडे जुन्या स्टॉलचे परवाने नूतनीकरण नाही, नवीन स्टॉल ना परवाने बंद त्यात बेकायदा स्टॉलचा सुळसुळाट झाल्याने नाराजी व संताप व्यक्त होऊ लागला. प्रहार जनशक्ती पक्षाने दिव्यांगांना स्टॉल परवाने देण्यासाठी आंदोलने केली. त्या नंतर देखील पालिका निर्णय घेत नव्हती. अखेर बच्चू कडू यांनी निर्देश दिल्या नंतर पालिकेने आता पहिल्या टप्प्यात दिव्यांगांना स्टॉल परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे. 

पालिकेने दिव्यांग, गटई व दूध स्टॉलसाठी धोरण ठरवून तसा प्रशासकीय ठराव केला आहे. त्या नंतर दिव्यांगांना स्टॉल परवाने देण्यासाठी अर्ज मागवले आहेत. पूर्वीच्या परवानगी मध्ये १०७ दिव्यांगांचे स्टॉल आहेत. आणखी सुमारे ४३ स्टॉल दिले जाण्याचे शक्यता वर्तवली जात आहे. नंतरच्या टप्प्यात गटई काम व दूध विक्री केंद्र स्टॉलना परवाने दिले जाणार आहेत. त्याच बरोबर आधीच्या परवान्यांचा आढावा पालिका घेणार आहे. 

गेल्या अनेक वर्षां पासून बंद असलेले स्टॉल परवाने पुन्हा मिळणार असल्याने बच्चू कडू यांच्या सह पालिकेचे आभार दिव्यांगांसह गटई काम, दूध स्टॉल मागणाऱ्यांनी मानले आहेत. 
 

Web Title: Divyang stalls will finally get licenses in Mira Bhayander after Bachchu Kadu's directive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.