४ दिवस पाणी दिवाळी
By admin | Published: November 10, 2015 11:50 PM2015-11-10T23:50:31+5:302015-11-10T23:50:31+5:30
जिल्हा लघु पाटबंधारे विभागाच्या निर्देशाने स्टेम व एमआयडीसीने लागू केलेली ३० टक्के कपात अखेर दिवाळीच्या काळापुरती रद्द केल्याने चार दिवसांकरीता का होईना मीरा-भार्इंदरकरांसह ठाणे
राजू काळे, भार्इंदर
जिल्हा लघु पाटबंधारे विभागाच्या निर्देशाने स्टेम व एमआयडीसीने लागू केलेली ३० टक्के कपात अखेर दिवाळीच्या काळापुरती रद्द केल्याने चार दिवसांकरीता का होईना मीरा-भार्इंदरकरांसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर व वसई-विरारकरांची ‘पाण्याची दिवाळी’ साजरी होणार आहे. मात्र असे असले तरी त्यानंतरची कपात मात्र सुरुच राहणार असल्याचे संकेत लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिक्षक एस. जे. निकर्डे यांनी दिले आहेत.
स्टेमकडून ठाण्यासह मीरा-भार्इंदर व भिवंडी-निजामपूर महापालिकांसह जिल्हा परिषदेंतर्गत ३४ गावांना तर एमआयडीसीकडून ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली,उल्हासनगर, भिवंडी-निझामपुर व वसई-विरार महापालिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. तो प्रामुख्याने बारवी, मोरबे धरणांसह आंध्रा धरणातून उल्हासनदीत होणाऱ्या पाण्याच्या विसर्गातून केला जातोे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने धरणातील जलसाठा सुमारे ७० टक्के इतका शिल्लक आहे. त्यामुळे तत्कालिन जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कपातीचे संकेत जिल्हा लघु पाटबंधारे विभागाने दिले होते. त्यानुसार ४ नोव्हेंबरपासून शटडाऊनच्या माध्यमातून पाणी कपातीला सुरुवात झाल्याने पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होऊन अनेक भागांत तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. या दोन्ही पाणीपुरवठा यंत्रणांपैकी स्टेमचा शटडाऊन प्रत्येक आठवड्याच्या बुधवार ते गुरुवार दरम्यान २४ तासांकरीता तर एमआयडीसीचा शटडाऊन बुधवार ते शुक्रवार दरम्यान ४८ तासांकरीता घेण्यात येत आहे.
त्याची दखल घेऊन तसेच नागरीकांची किमान दिवाळीच्या सणात पाण्याची नियोजित पायपीट होऊ नये, यासाठी राज्य शासनाने लघुपाटबंधारे विभागाला दिवाळी दरम्यानच्या पाणीकपातीला स्थगिती दिल्याने दिवाळीतील पाणीकपात टळली.
त्यानंतरच्या कपातीला मात्र राज्य शासनाने कात्री लावल्याने सणवारीनंतर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येणार आहे.
७२ तासांची ही पाणीकपात ऐन दिवाळी सणात सुरु झाल्याने उद्भवलेल्या पाणीटंचाईमुळे नागरीकांच्या तोंडचे पाणीच पळाले होते.