कंत्राटी कामगारांची दिवाळी अंधारात?

By admin | Published: October 26, 2016 05:19 AM2016-10-26T05:19:56+5:302016-10-26T05:19:56+5:30

महापालिकेकडून बिले वेळेवर निघत नसल्याचे कारण पुढे करीत गेल्या सहा-सात महिन्यांपासून वसई विरार पालिकेतील कंत्राटी कामगारांचे पगार उशिराने होऊ लागले

Diwali of contract workers in darkness? | कंत्राटी कामगारांची दिवाळी अंधारात?

कंत्राटी कामगारांची दिवाळी अंधारात?

Next

- शशी करपे,  वसर्ई
महापालिकेकडून बिले वेळेवर निघत नसल्याचे कारण पुढे करीत गेल्या सहा-सात महिन्यांपासून वसई विरार पालिकेतील कंत्राटी कामगारांचे पगार उशिराने होऊ लागले आहेत. आता दिवाळी तोंडावर असताना गेल्या महिन्याचा पगार अद्याप न मिळाल्याने कंत्राटी कामगारांची दिवाळी अंधारात जाण्याची चिन्हे आहेत. तर बोनसबद्दल नेहमीप्रमाणे ठेकेदार काही बोलायलाच तयार नसल्याने जे हातात पडेल ते घेण्याची कामगारांची तयारी आहे.
वसई-विरार महापालिकेने पाणीपुरवठा, उद्याने, बांधकाम, दिवाबत्ती, आरोग्य, साफसफाई, आस्थापना अशा विविध विभागांतील कामे कंत्राटी पद्धतीने दिली आहेत. यासाठी महापालिकेकडून अनेक कंत्राटदार नियुक्त करण्यात आलेले आहेत. या कामांसाठी कंत्राटदारांनी कर्मचारी व कामगार नियुक्त केलेले असून त्याची संख्या चारशेच्या घरात आहे. मात्र या कर्मचारी व कामगारांचे मागील सहा-सात महिन्यांपासून पगार अनियमितपणे होत आहेत. काही विभागातील कर्मचाऱ्यांना तर गेल्या दोन महिन्यांपासून पगार दिले गेलेले नाहीत. आता ऐन दिवाळीच्या तोंडावरही कंत्राटदारांनी कर्मचारी-कामगारांना पगार देण्यास नाखुशी दर्शवून वेठीस धरल्याने या कर्मचारी-कामगारांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे.
महापालिकेने आमची बिले थकवल्याचा दावा कंत्राटदारांनी केला आहे. तर महापालिकेने कर्मचारी-कामगारांचे पगार काढणे कंत्राटदारांचे काम आहे, असे सांगून पलटवार केला आहे.
पालिकेकडून बिले वेळेत निघाली नाही तरी ठेकेदारांनीच वेळेत पगार दिले पाहिजेत असे बंधन पालिकेने घातले आहे. मात्र, ठेकेदार बिले निघत नसल्याचे कारण पुढे करीत कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देत नसल्याच्या तक्रारी आहेत. दिवाळी तोंडावर आली असताना ठेकेदारांनी २५ आॅक्टोबर उलटून गेल्यानंतरही पगार दिलेले नसल्याने कर्मचारी नाराज झाले आहेत.
मध्यंतरी कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे कारण सांगून आयुक्तांनी कंत्राटी कामगारांची संख्या कमी केली होती. त्यावेळी ठेकेदार प्रचंड घोटाळे करीत असल्याचे उजेडात आले होते. पण, धक्कादायक बाब म्हणजे ज्या ठेकेदारांकडे संशयाने पाहिले जात होते, त्याच ठेकेदारांना पुन्हा ठेके दिले गेले आहेत. अनेक ठेक्यांमध्ये सत्ताधारी बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा थेट संंबंध असल्याचेही उजेडात आले आहे. मात्र, त्यांच्याकडूनच कामगारांची पिळवणूक होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, वर्षभर पिळवणूक करणारे ठेकेदार दिवाळीत बोनसच्या नावाखाली दोन-तीन हजार रुपये देऊन कर्मचाऱ्यांना वाटाण्याचा अक्षता लावतात. आता तर या महिन्यांचा पगार न देणाऱ्या ठेकेदारांकडून दिवाळी बोनसची अपेक्षा का धराची? असा सवाल कर्मचारी उपस्थित करु लागले आहेत.

महापालिकेकडून सर्व कंत्राटदारांची बिले मंजूर करण्यात आलेली आहेत. ही बिले काढण्यासाठी महापालिकेच्या मुख्य व लेखा विभागाकडे पाठवण्यात आलेली आहेत. त्यामुळे पुढील कार्यवाही तो विभाग करीत आहे. बिले वेळेवर मिळाली नाही तरी कामगारांचे पगार नियमितपणे करण्याची जबाबदारी ठेकेदाराची असते.
- सदानंद सुर्वे, सहाय्यक आयुक्त, आस्थापना विभाग

काही तांत्रिक कारणांमुळे बिले रखडली होती. दोन-तीन दिवसात ही बिले काढली जातील. केवळ तीन-चार कंत्राटदारांची बिले काढणे बाकी आहेत. मात्र कंत्राटदारांनी कर्मचारी-कामगारांचे पगार थकवणे चुकीचे आहे. कर्मचारी-कामगारांना पगार देता येतील इतक्या आवश्यकतेची बिले काढलेली आहेत.
- प्रवीण वडगाई,
मुख्य लेखा व वित्त अधिकारी

आरोग्य विाागात ही समस्या नाही. आम्ही आमच्या कर्मचारी-कामगारांचे पगार महिन्याच्या ७ ते १० तारखेपर्यंत देतो.
- रविंद्र चव्हाण, ठेकेदार
आम्ही आमच्या कर्मचारी-कामगारांचे पगार बुधवार-गुरुवारपर्यंत देणार आहोत. महापालिकेने आमची जानेवारीपर्यंतची बिले थकवल्याने आम्हाला कर्मचाऱ्यांचे पगार देता आलेले नाहीत.
- अमित पाटील, ठेकेदार

Web Title: Diwali of contract workers in darkness?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.